बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात येत आहे? अस्तित्वात नसेल तर नाल्याची निर्मिती करू नका असा आदेश जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी 1 जानेवारी रोजी स्वतः नाल्याची पाहणी करून बजावला होता. तरी देखील वॉर्ड क्र. 50 च्या लोकप्रतिनिधींनी काही मोजक्याच लोकांना हाताशी धरून या नाल्यासंदर्भात जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आनंदनगर वडगांव परिसरात अस्तित्वात नसलेल्या नाल्याच्या निर्मितीचा घाट लोकप्रतिनिधींनी घातला आहे. सातबारा उतारा, कॉमन पिटीशीट, अनगोळ ग्रामीण नकाशा तसेच बुडा लेआऊट प्लॅन यापैकी कोणत्याही कागदपत्रात नाला अस्तित्वात असल्याचा उल्लेख नाही तरी देखील दडपशाही करून महापालिका प्रशासनाला हाताशी धरून आनंदनगर दुसरा क्रॉस येथील नागरिकांच्या खासगी मालमत्तेचे नुकसान करून सदर नाल्याच्या निर्मितीचा प्रयत्न येथील लोकप्रतिनिधी करीत आहेत. वॉर्ड क्र.50 च्या लोकप्रतिनिधी केवळ आपल्या अट्टाहासापोटी स्थानिक नागरिकात संभ्रम निर्माण करत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी जनतेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होत असल्याचा आरोप आनंदनगर येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.