Sunday , August 16 2026
Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या वर्तनाविरोधात अभाविपकडून तीव्र निषेध…

Spread the love

 

बेळगाव : धारवाडचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नारायण बरमणी यांच्यावर मुख्यमंत्री यांनी हात उगारल्याच्या घटनेवरून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बेळगावातील चन्नम्मा चौकात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.
बेळगावमध्ये आयोजित संविधान बचाव कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी एएसपी नारायण बरमणी यांच्यावर हात उगारल्याप्रकरणी बेळगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) संघटनेने आंदोलन उभारले. चन्नम्मा चौकात मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेल्या पोस्टरला आग लावून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. या निषेधानंतर कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौकापासुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी “जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारावं,” अशी मागणी केली. मात्र, यावेळी काही कार्यकर्त्यांनी गेटवर चढून कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलिसांनी रोखले.

पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. आम्ही तुमच्यासाठी लढतो आहोत, आमचा आवाज ऐका, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनाच्या माध्यमातून अभाविप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्तनाचा निषेध करत, प्रशासकीय यंत्रणेच्या सन्मानासाठी आवाज उठवण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना अभाविपच्या आंदोलकांनी सांगितले की, ‘पहलगाम’मधील घटनेचा संपूर्ण देश निषेध करत असताना, शांततेने प्रश्न सोडवण्याचे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीच महिलांवर हल्ला घडवून आणला. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, पोलिस अधिकाऱ्यांचा मंचावर अपमान झाला. संविधानाचे धडे देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाच संविधानाची जाण नाही, जर असं वर्तन सुरूच राहिले, तर अभाविप संविधान शिकवण्याची जबाबदारी उचलेल असे म्हणत त्यांनी इशारा दिला. यावेळी मोठ्या सांख्येने अभाविपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

शांतीनगर टिळकवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Spread the love  बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *