बेळगाव : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारत पाकिस्तानला देत असलेल्या प्रत्युत्तराच्या समर्थनार्थ बेळगावमध्ये आज राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांची शनिवारी भव्य रॅली काढण्यात आली. ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत विद्यार्थी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सी.एम. त्यागराज म्हणाले की, केंद्र सरकार आणि भारतीय सैन्याला पाठिंबा देण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर यात्रा’ काढण्यात आली आहे. विद्यार्थी शक्ती हीच राष्ट्रशक्ती असून, सर्वांनी एकत्र येऊन आपल्या सैनिकांना पाठिंबा द्यायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. विविध विभागांच्या प्रमुखांनीही या रॅलीमागील उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि देशभक्ती जागृत व्हावी यासाठी ही रॅली काढण्यात येत असून, युवा पिढीने देशावरील कोणत्याही आक्रमणावेळी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असे ते म्हणाले.
बेळगाव जिल्हा क्रीडांगणापासून सुरू झालेली ही रॅली कोल्हापूर सर्कल, डॉ. बी.आर. आंबेडकर मार्गे राणी चन्नम्मा सर्कल येथे पोहोचून समाप्त झाली. या रॅलीत विद्यार्थी, कर्मचारी आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.