बेळगाव : ‘ऑपरेशन सिंदूर’चे नेतृत्व करणाऱ्या आणि बेळगावची सून असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरोधात अवमानकारक विधान केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे भाजप मंत्री विजय शाह यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी बेळगाव अल्पसंख्याक काँग्रेसने आज तीव्र निदर्शने केली.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजप मंत्र्याने केलेल्या विधानाचा निषेध करत, अल्पसंख्याक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेळगावी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. बेळगाव अल्पसंख्याक काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल गफार घीवाले यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, भारतीयांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने धडा शिकवला आहे. अशा परिस्थितीत कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरोधात भाजप मंत्री विजय शाह यांनी केलेले विधान अत्यंत निंदनीय आहे. घीवाले यांनी मागणी केली की, मध्य प्रदेश सरकारने अवमानकारक विधान करणाऱ्या या भाजप मंत्र्याला मंत्रिमंडळातून आणि आमदारकीवरून बडतर्फ करावे. तसेच, संतबस्तवाड येथील धर्मग्रंथ जाळल्याप्रकरणीही तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मन्सूर अली अत्तर, सलीम खतीब, मैनूद्दीन मकानदार, बाबूलाल बागवान, अल्लाबक्ष इनामदार, मन्सूर अत्तर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.