बेळगाव : आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघात समाविष्ट करून घेण्याचे खोटे आश्वासन देऊन बेळगाव जिल्ह्यातील चिंचणी गावातील 19 वर्षीय राज्यस्तरीय उदयोन्मुख क्रिकेटपटूला 24 लाख रुपयांना फसवल्याच्या गुन्ह्याखाली बेळगाव पोलिसांनी उत्तर प्रदेशातील दोघांना नुकतीच अटक केली आहे.
उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील सुलतान आणि दिवाकर अशी ओळख पटवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बेळगाव जिल्ह्यातील चिंचणी (ता. चिक्कोडी) गावातील उदयोन्मुख क्रिकेटपटू राकेश यदुरे या खेळाडूने दाखल केलेल्या तक्रारीवरून त्यांना अटक केली. या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना बेळगावचे पोलिस अधीक्षक भीमाशंकर एस. गुळेद म्हणाले, “तपासातून असे दिसून आले आहे की सुलतानने यापूर्वीही अशाच पद्धतीने दोघांना फसवले होते, तर दिवाकर हा पहिल्यांदाच असा गुन्हा करत असल्याचे दिसून येते.” पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मे 2025 मध्ये हैदराबाद येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेत यदुरे याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते. आपल्या कामगिरीचा अभिमान बाळगून त्याने इंस्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर कांही वेळातच त्याला राजस्थान रॉयल्सच्या प्रतिभा शोधणाऱ्या (टॅलेंट स्काउटिंग) चमुचा प्रतिनिधी असल्याचे भासवणाऱ्या एका आरोपीकडून फ्रेंड रिक्वेस्ट मिळाली. क्रिकेटपटू राकेश यदुरे याला डिसेंबर 2024 मध्ये एक मेसेज आला ज्यामध्ये आरोपीने दावा केला होता की त्याला आयपीएल संघासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. मेसेजमध्ये एका तथाकथित नोंदणी फॉर्मची लिंक होती आणि त्यात 2000 रुपयांचे प्रारंभिक पेमेंट करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर पुढील काही महिन्यांत म्हणजे 22 डिसेंबर 2024 ते 19 एप्रिल 2025 दरम्यान यदुरे याने मॅच फीच्या नावाने 40 हजार ते 8 लाख रुपयांपर्यंत असे एकूण 23 लाख 53 हजार रुपये टप्प्याटप्प्याने भरले.
अखेर क्रिकेटपटू राकेश यदुरे याला गेल्या 17 मे रोजी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बेळगाव सायबर, इकॉनॉमिक अँड नार्कोटिक्स (सीईएन) क्राइम पोलिस ठाण्याशी संपर्क साधून गुन्हा नोंदवला आणि तपासाला गती मिळाली. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातून दोन्ही आरोपींना अटक केली असून दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत आहेत.