बेळगाव (वार्ता) : एक ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, या दिवसाचे औचित्य साधून बेळगाव जिल्हा स्वातंत्र सैनिक आणि उत्तराधिकारी संघाच्यावतीने वृक्षारोपण, सीसीटीव्ही कॅमेरा उद्घाटन, टिळक पुण्यतिथी आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष शतायुषी राजेंद्र कलघटगी हे होते तर पाहुणे म्हणून बेळगावचे डीसीपी विक्रम आमटे, टिळकवाडीचे सीपीआय विनायक बडिगेर हे उपस्थित होते.
संघटनेचे सहकार्यदर्शी संतोष होंगल यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. स्वातंत्र्यसैनिक संघटनेची ही कर्नाटकातील एकमेव भव्य इमारत आहे असे सांगून त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. विक्रम आमटे यांच्या हस्ते आजच वृक्षारोपण केलेल्या रोपट्यांना पाणी घालण्यात आले. त्यांच्याच हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन व सीसीटीव्ही कॅमेर्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहा कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. ज्यांनी गेल्या दोन वर्षात आपल्या पाच अम्ब्युलन्सद्वारा बेळगाव आणि परिसरातील पाचशेहून अधिक कोरोना बाधित मृतदेह इस्पितळातून घेऊन जाणे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे असे कार्य केले आहे. अशा सचिन पाटील, संदीप कामुले, महेश जाधव, भरत नागरोळी, राजेंद्र बैलूर व अभिषेक पुजारी यांचा विक्रम आपटे यांच्या हस्ते शाल व राजेंद्र कलघटगी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात विक्रम आमटे यांच्या हस्ते राजेंद्र कलघटगी यांना सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक गृहनिर्माण संघाचे अध्यक्ष संतोष भेंडीगिरी यांच्या हस्ते आमटे, विनायक बडिगेर व टिळकवाडी पोलीस ठाण्याचे रमेश बाने यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कुमारी वृंदा संतोष होंगल हिने देशभक्तीपर गीत सादर केले. तर यावेळी बोलताना सत्कारमूर्तीच्या वतीने सचिन पाटील म्हणाले की, ‘गेल्या दोन वर्षात आमचे मार्गदर्शक रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने 550 हून अधिक मृतदेहांवर आम्ही अग्निसंस्कार केले. आमच्या पाच अम्ब्युलन्स बेळगावहून बेंगलोरपर्यंत आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन आल्या. तहान भूक विसरून आम्ही एका वेगळ्या भावनेने जे कार्य केले त्याचे सार्थक झाले असे वाटते. आजच्या या सत्काराने आम्हाला नवीन ऊर्जा मिळाली आहे. याही पुढे आम्ही कार्यरत राहणार असून कोणीही आम्हाला हाक मारावी. आम्ही त्यांच्या मदतीसाठी केव्हाही धावून जाऊ’ असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना विक्रम आमटे यांनी स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे कौतुक केले. ‘त्यांच्यामुळेच आज आम्ही स्वतंत्र भारतात ताठ मानेने जगत आहोत असे सांगून ती म्हणाले की, कोरोणा अद्याप संपलेला नाही कोरोणाची तिसरी लाट देशाच्या काही भागात सुरू झाली आहे. ती आपल्या भागात येऊ नये यासाठी आपण सर्वजण दक्षता घेऊया’ असे सांगून त्यांनी कोरोना योद्ध्यांचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी यांच्या अध्यक्षीय समारोपानंतर सेक्रेटरी दिलीप सोहनी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत लाड यांनी केले. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी किरण बेकवाड, वर्धमान मरेण्णावर तसेच वैभव खाडे, हिरालाल चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
Check Also
महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू
Spread the love शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर …