बेळगाव : दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त मराठी विद्यानिकेतनचे शिक्षक धर्मवीर संभाजी चौकात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी संदेश देण्यासाठी उभे होते. शनिवारी होणाऱ्या अनंत चतुर्दशीवेळी प्रदूषण टाळून पर्यावरणाचा मित्र बनण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आले. यावेळी फटाके विरहित, डॉल्बी डीजे विरहित गणेशोत्सव साजरा करण्याचे फलक लावण्यात आले होते. या समाजभान उपक्रमामुळे जनतेने कौतुक केले आहे. प्रशासनही या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आवाहन करतेच आहे. याच आवाहनाला चक्क शिक्षकांनी हातभार लावला आहे. फटाक्यांमुळे कानाचे, घशाचे विकार, डॉल्बीच्या लेझर किरणांपासून डोळ्यांचे विकार, निर्माल्य कलशामध्ये निर्माल्य जमा करून पाण्याचे प्रदूषण टाळूया. आपल्या कृतीने कोणाला इजा होणार नाही किंवा संकटात सापडणार नाही याची दक्षता आपण घेऊया. ‘पर्यावरणपूरक माहिती पुस्तक’ ही वाटण्यात आले. शिक्षक दिन म्हणजे केवळ अभिनंदनाचा दिवस नाही, तो समाजाला दिशा देण्याचा दिवस असतो – आणि आपण ती दिशा अतिशय भानाने मराठी विद्यानिकेतन परिवाराने ठरवली. पर्यावरणपूरक, डॉल्बीमुक्त व फटाके विरहित अनंत चतुर्दशी साजरी करण्यासाठी समाजाला जे आवाहन केले, ते संवेदनशीलतेचे, जबाबदारीचे आणि खऱ्या अर्थाने “शिक्षकत्वाचे” द्योतक होते. आजच्या युगात सण साजरे करताना पर्यावरणाचे नुकसान, ध्वनी प्रदूषण, वृद्ध व रुग्णांची होणारी गैरसोय, प्राण्यांच्या जीवाला धोका – या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. पण शिक्षकांनी हे लक्षात घेत, आपल्या विद्यार्थी आणि पालक मंडळींसह समाजालाही सजग आणि जागरूक करण्याचे जे कार्य केले आहे, त्याला खरंच तोड नाही. या उपक्रमामुळे फक्त शाळेपुरती नाही, तर समाजाच्या विचारपद्धतीत सकारात्मक बदल घडवण्याचा मार्ग तयार झाला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात संवेदनशील नागरिक घडवण्याचे बीज पेरले आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकापुरताच मर्यादित नाही हे शिक्षकांनी दाखवून दिले.
यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta