Friday , April 17 2026
Breaking News

राज्य सरकारमुळे बेळगाव-धारवाड रेल्वे प्रकल्पाला विलंब : मंत्री व्ही. सोमण्णा

Spread the love

 

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगावातील रेल्वे विकासासाठी मोठा निधी मंजूर केला आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी सोमवारी बेळगावात पत्रकार परिषदेत सांगितले. बेळगाव-धारवाड थेट रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
बेळगाव दौऱ्यावर आलेले मंत्री व्ही. सोमण्णा यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “२०२० मध्ये पुणे-लोंढा रेल्वेच्या विकासासाठी १,९०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. पुणे-मिरज दुहेरीकरणाचे कामही सुरू झाले असून, ते पूर्ण झाले आहे. २०२३ मध्ये बेळगाव रेल्वे स्थानकाचे १९३ कोटी रुपये खर्चून आधुनिकीकरण करण्यात आले. तसेच, फिट लाइन्सचेही काम पूर्ण झाले आहे.” बेळगावासह उत्तर कर्नाटकचा भाग कृषी उत्पादन आणि उद्योगांसाठी ओळखला जातो. त्यामुळे येथील रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी दुहेरीकरणासोबतच बेळगाव-धारवाड रेल्वे प्रकल्पासाठी ९३७ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री संतोष लाड यांच्या सहकार्याअभावी बेळगाव-धारवाड थेट रेल्वे प्रकल्प रखडला असल्याचा आरोपही सोमण्णा यांनी केला. हुबळी येथे अद्याप ४५ एकर जमीन संपादित करायची आहे. याबद्दल आपण २-३ वेळा लाड यांच्याशी बोललो, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. प्रल्हाद जोशी आणि जगदीश शेट्टर यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला आहे. मी स्वतः त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहे. बेळगावात शंभर टक्के भूसंपादन झाले आहे. ते असे का करत आहेत, हे मला माहीत नाही. जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर आम्ही कायदेशीर मार्गाने कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला. “या प्रकल्पासाठी ९३७ कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. संतोष लाड अजूनही तरुण आहेत, ते असे का करत आहेत, हे मला माहीत नाही. मी स्वतः जाऊन त्यांची भेट घेणार आहे. मी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशीही अनेक वेळा बोललो आहे. राज्याने या कामात अडथळे का आणले, हे सरकारने सांगितले पाहिजे,” असेही ते म्हणाले. इतर राज्यांमध्ये सरकार विकासासाठी सहकार्य करत आहे, पण हे सरकार विकासाऐवजी दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त आहे, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. बेळगावात आज विविध रेल्वे कामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. बेळगावासह खानापूर आणि अनेक ठिकाणी उड्डाणपुलांचे भूमिपूजन करत आहोत. देशातील रेल्वे स्थानकांचे स्वरूप बदलत आहे. पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत २०४७’ या स्वप्नानुसार आम्ही वाटचाल करत आहोत. सवदत्ती आणि रामदुर्ग दरम्यान नवीन रेल्वेसाठी मागणी असून, आम्ही त्यावर विचार करणार आहोत, असेही ते म्हणाले. देशात अनेक ठिकाणी मागणी वाढत असून, पंतप्रधान असे राज्य बदलण्याचे काम करत आहेत, जिथे अराजक होते आणि विकास झाला नव्हता, असे सांगत त्यांनी पंतप्रधानांच्या कार्याचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

वडगाव विभागातील पारंपरिक श्री शिवजयंती भव्य मिरवणूक सोमवारी

Spread the love  पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी मिरवणूकी संदर्भात चर्चा बेळगाव : वडगाव परिसरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *