Monday , September 21 2026
Breaking News

विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला दुहेरी मुकुट

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ, बेळगाव येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुलींच्या फुटबॉल संघाने कुरुक्षेत्र हरियाणा येथे झालेल्या विद्याभारती अखिल भारतीय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विजेतेपदासह दुहेरी मुकुट संपादन केला आहे. त्यामुळे या संघांची रांची झारखंड येथे होणाऱ्या एसजीएफआय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कुरुक्षेत्र, हरियाणा येथे गेल्या 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान 36 वी विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत संत मीरा शाळेच्या संघांनी दक्षिण-मध्य क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले होते. प्राथमिक अर्थात 14 वर्षाखालील मुलींच्या गटातील पहिल्या सामन्यात संत मीरा कर्नाटक संघाने प्रतिस्पर्धी पंजाबचा 2-0 असा पराभव केला. समीक्षा खन्नुरकर हिने 2 निर्णायक गोल केले. दुसऱ्या सामन्यात संत मीरा संघाने प्रतिस्पर्धी उत्तर प्रदेश संघाचा 1-0 असा पराभव केला. निर्णायक गोल प्रणिती बडमंजी हिने नोंदवला. तिसऱ्या सामन्यात संत मीरा कर्नाटक संघाने प्रतिस्पर्धी राजस्थान संघावर 8-0 असा दणदणीत विजय मिळवला. विजयी संघाच्या निधीशा दळवी (3 गोल), समीक्षा खन्नुरकर, कल्याणी हलगेकर (प्रत्येकी 2 गोल) व हर्षिता गवळी (1गोल) यांनी गोल नोंदवले. चौथ्या अंतिम सामन्यात संत मीरा कर्नाटक संघाने प्रतिस्पर्धी मध्य प्रदेश संघावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. विजयी संघाच्या निधीशा दळवी हिने हॅट्रिकसह 3 गोल, समीक्षा खन्नुरकर हिने 2 गोल केले.

माध्यमिक मुलींच्या गटातील पहिल्या लढतीत संत मीरा कर्नाटक संघाने प्रतिस्पर्धी राजस्थानचा 5-0 असा पराभव केला. विजयी संघाच्या दीपिका व दीपा बिडी यांनी प्रत्येकी 2 गोल तर मोनिता हिने 1 गोल केला. दुसऱ्या सामन्यात संत मीरा संघाने प्रतिस्पर्धी उत्तर प्रदेश संघाला 3-0 असे नमवले. विजयी संघाच्या दीपिका हिने 2 आणि दीपा बिडी हिने 1 गोल केला. तिसऱ्या सामन्यात संत मीरा कर्नाटक संघाने प्रतिस्पर्धी बिहार संघाला 2-0 असे पराजीत केले. विजयी संघाच्या दीपिका व दीपा बिडी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. अंतिम सामन्यात संत मीरा कर्नाटक संघाने प्रतिस्पर्धी पंजाब संघाचा 4-0 असे पराभूत करून जेतेपद हस्तगत केले. विजयी संघाच्या कर्णधार दिपा बिडी हिने 2 गोल तर दीपिका व मोनिता यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

विजेत्या प्राथमिक मुलींच्या संघात कर्णधार निधिशा दळवी, उपकर्णधार समीक्षा खन्नुरकर, अद्विता दळवी, आदिती सुरतेकर, कनिष्का हिरेमठ, कृतिका हिरेमठ, हर्षिता गवळी, अनन्या रायबागकर, कल्याणी हलगेकर, समृध्दी कोकाटे, समृध्दी घोरपडे, प्रणिता बडमंजी, स्वाती फडनाडी यांचा, तर माध्यमिक मुलींच्या संघात कर्णधार दीपा बिडी, उपकर्णधार हर्षदा जाधव, सृष्टी सातेरी, श्रेया लाटुकर, मोनिता रियांग, दीपिका रिंयांग अमृता मालशोय, श्रद्धा भंडारगाळी, संचिता सुतार, सिंचना तिगडी, श्रुती येळ्ळूरकर आणि हिंदवी शिंदे यांचा समावेश होता. या संघाला क्रीडाशिक्षक, शिवकुमार सुतार, यश पाटील, शिक्षिका धनश्री पाटील, प्रेमा मेलीनमनी, आनंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तसेच विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, उपाध्यक्ष रामनाथ नाईक आणि जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *