Sunday , July 26 2026
Breaking News

सुरळीत विमानसेवेसाठी उद्योजक संघटना आवाज उठवणार

Spread the love

 

बेळगाव : उडान योजना बंद झाल्यामुळे बेळगावची विमानसेवा आता बंद होत आहे. त्यामुळे उद्योजक, व्यापाऱ्यांसह सर्वांचीच मोठी गैरसोय होत आहे. बेळगाव विमानतळाच्या पूर्वी असलेल्या १३ विमान सेवा ज्या टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्या त्या ताबडतोब पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी दि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तसेच इतर उद्योजक संघटनांनी केली आहे. याबाबत पाठपुरावा करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. यापुढे आता आंदोलन छेडण्याची तयारी देखील करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पत्रकार परिषदेवेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मुनोळी यांच्यासह सचिव सतीश कुलकर्णी, फाउंड्री क्लस्टरचे राम भंडारे, लघु उद्योजक संघटनेचे नितीन लांडगे, लघुउद्योग भारतीचे सचिन सबनीस आणि इतर सदस्य उपस्थित होते. बेळगावच्या विमान सेवांमध्ये अलीकडच्या काळात मोठी घट झाली असून काही सेवा पूर्णतः बंद झाल्या आहेत. व्यापार, उद्योग, वाणिज्य तसेच सामान्य प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या उच्च क्षमतेच्या व महत्त्वाच्या शहरांशी असलेल्या विमानसेवांमध्ये झालेली कपात बेळगाव आणि परिसराच्या आर्थिक तसेच व्यापार व औद्योगिक प्रगतीला खिळ घालणारी ठरत असल्याचे मत उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले.

विमान संपर्कात घट होत असल्यामुळे प्रादेशिक विकास प्रक्रियेत खोळंबा निर्माण झाला असून व्यापार वृद्धीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. विमानसेवा पूर्ववत सुरू  करणे, नव्या मार्गांचा समावेश करणे, विमानतळाच्या संभाव्य क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच या संदर्भात पंतप्रधान कार्यालय आणि विमान उड्डाण मंत्रालयाला निवेदने देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात बोलताना राम भंडारे म्हणाले की, बेळगावच्या असलेल्या १३ विमानसेवा बंद झाल्या आहेत. बेळगाव विमानतळाच्या अखत्यारीत सहा सेक्टर होते. येथील विमान सेवेला बेळगावकरांसह प्रवाशांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. ज्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास उडान व्याप्तीत (झोन) २०२४ मध्ये हवाई प्रवासासाठी बेळगाव विमानतळाचा सर्वाधिक ३ लाख ४७ हजार प्रवाशांनी लाभ घेतला होता. संबंधित विमान सेवांचा बेळगावच्या औद्योगिक, व्यापार शिक्षण वैद्यकीय कृषी वगैरे सर्व क्षेत्रांना फायदा होत होता. तथापि कटकारस्थान केल्याप्रमाणे गेल्या दोन वर्षात टप्प्याटप्प्याने बेळगाव विमानतळाच्या विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *