Sunday , September 20 2026
Breaking News

41 वे कडोली मराठी साहित्य संमेलन रंगणार उद्या

Spread the love

 

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे कडोली (ता. जि. बेळगाव) येथील मराठी साहित्य संघातर्फे राज्य मराठी विकास संस्था मुंबई व सांगाती साहित्य अकादमी बेळगाव यांच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 11 जानेवारी 2026 रोजी 41 वे कडोली मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

कडोली येथे गेल्या चार दशकांपासून आयोजित केले जाणारे हे मराठी साहित्य संमेलन एकूण पाच सत्रांमध्ये पार पडणार आहे. गावातील स्वामी विवेकानंद साहित्य नगरी (श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठाचे आवार) या ठिकाणी होणाऱ्या या संमेलनाचा श्री गणेशा ग्रंथदिंडीने होणारा असून कडोली गावच्या वेशीपासून रविवारी सकाळी 9:30 वाजता या ग्रंथ दिंडीला प्रारंभ होणार आहे. यावेळी पालखी पूजन गावातील कलमेश्वर भजनी मंडळाचे ह.भ.प. कृष्णा चन्नाप्पा मस्कार यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या पहिल्या सत्रात सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उद्घाटन समारंभ आणि संमेलनाध्यक्ष सोलापूरचे प्राचार्य महेंद्र कदम यांचे अध्यक्षीय भाषण होईल. दुसऱ्या सत्रात दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत नाशिकचे व्याख्याते प्रा. राजेश्वर शेळके यांचे या ‘जगण्याचे पैलू शंभर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार असून तिसऱ्या सत्रात दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंतच्या कालावधीत स्थानिक कवींचा सहभाग असणारे काव्यतरंग कवी संमेलन होईल. चौथ्या सत्रात दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत ‘मी व माझी कथा’ हा कार्यक्रम सादर केला जाईल. सादरकर्ते सांगलीचे रवी राजमाने हे असणार आहेत. शेवटच्या समारोपाच्या पाचव्या सत्रात दुपारी 4 वाजल्यानंतर निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडेल. या कवी संमेलनात कवी प्रा. श्रीनिवास मस्के (नांदेड), कवयित्री पूजा भडांगे (पुणे) व कवयित्री लता ऐवळे कदम (सांगली) यांचा सहभाग असणार आहे. तरी समस्त मराठी भाषिकांसह साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने संमेलनाला उपस्थित रहावे, असे जाहीर निमंत्रण मराठी साहित्य संघ कडोलीचे अध्यक्ष शिवाजी कुट्रे आणि संमेलनाच्या स्वागताध्यक्ष सविता सु. पाटील दिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *