Sunday , July 26 2026
Breaking News

हुतात्मा जवान जगदीश शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Spread the love

 

बेळगाव : देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झालेले बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील जवान जगदीश शिंदे यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जगदीश शिंदे यांचा २ फेब्रुवारी रोजी हरियाणातील अंबाला येथे कर्तव्य बजावत असताना भीषण वाहन अपघातात मृत्यू झाला. आज सकाळी ८:३० वाजता त्यांचे पार्थिव बेळगावच्या सांबरा विमानतळावर आणण्यात आले. तिथे लष्करी अधिकाऱ्यांनी मानवंदना दिल्यानंतर पार्थिव त्यांच्या मूळ गावी कंग्राळी खुर्द येथे नेण्यात आले. स्थानिक मराठी शाळेच्या आवारात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी आमदार चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार संजय पाटील, लष्करी अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांसह हजारो नागरिकांनी पुष्पचक्र अर्पण करून दर्शन घेतले.

यानंतर गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. लष्करी वरिष्ठ अधिकारी राऊत यांच्या उपस्थितीत हवेत गोळ्यांच्या तीन फैरी झाडून वीर जवानाला सलामी देण्यात आली. त्यानंतर जगदीश शिंदे यांच्या पार्थिवावर लपेटलेला राष्ट्रध्वज अत्यंत जड अंतःकरणाने त्यांच्या पत्नीच्या स्वाधीन करण्यात आला. हा क्षण पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

कंग्राळी खुर्द येथील स्मशानभूमीत जगदीश शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हुतात्मा जवानाचे वडील आणि मुलांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. जवान जगदीश शिंदे हे अत्यंत गरीब कुटुंबातील होते. त्यांच्या वडिलांनी मजुरी करून आपल्या मुलांना शिकवले. विशेष म्हणजे त्यांची दोन्ही मुले लष्करात भरती झाली. जगदीश यांनी २४ वर्षे सैन्यदलात सेवा बजावली होती आणि केवळ दोन महिन्यांत ते निवृत्त होणार होते. मात्र, त्याआधीच ही दुःखद घटना घडल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आमच्या गावातील वामन जाधव हे २०२३ मध्ये शहीद झाले होते आणि आता जगदीश शिंदे यांनी देशासाठी बलिदान दिले आहे, अशी भावना माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण कोलकार यांनी व्यक्त केली. माझा शालेय मित्र जगदीश शिंदे याने देशासाठी दिलेले बलिदान सर्वोच्च आहे. अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावान असलेल्या जगदीश यांच्या अंत्यसंस्काराला जमलेली ही अफाट गर्दीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची साक्ष देत आहे, अशा शब्दांत ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील आणि किशन पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हुतात्मा जगदीश शिंदे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *