Tuesday , July 23 2024
Breaking News

एमडी अंमली पदार्थाचे चंदगड तालूक्यात धागेदोरे, एकाला अटक

Spread the love

 

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सध्या देशभर गाजत असलेले ड्रग्ज प्रकरणातील हाय प्रोफाईल मुंबई कनेक्शन थेट चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीशी आल्याने चंदगड तालूक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका हाय प्रोफाईल वकिलाचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत असून या प्रकरणात ढोलगरवाडीतून एकाला अटक करून पोलिसांची टिम मुंबईला रवाना झाली आहे. कोट्यावधींचा या अमली पदार्थ तस्करी प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांच नार्कोटीक्सच्या विशेष पथकाने रविवारी रात्री छापा टाकला होता. त्याचा गेले दोन दिवस तपास सुरू असून कोणत्याही प्रकारची माहिती अद्याप पोलिसांकडून अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही. या कमालीच्या गुप्ततेवरून हे प्रकरण खूप गंभीर आणि मोठे असण्याची शक्यता आहे. आज (मंगळवारी) तपास पूर्ण झाला की याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार होती. तथापि याप्रकरणातील नारकोटिक्सचे विशेष पथक मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

हा छापा ढोलगरवाडी गावानजीक शेतामध्ये असलेल्या एका फार्म हाऊस सदृश ठिकाणी टाकण्यात आला आहे. सर्व बाजूंनी बंदिस्त असलेल्या या फार्म हाऊसवर नेमके काय प्रकार केले जात होते, याबाबत ग्रामस्थांना देखील नीटशी माहिती नाही. अचानक झालेल्या कारवाईनंतर या जागेकडे लोकांचे लक्ष गेले असून याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असून यामध्ये स्थानिक पोलिसांना देखील लांब ठेवण्यात आले आहे. प्रकरणच इतके गंभीर असल्याने रात्रीचा बंदोबस्त देखील मुंबई पोलिसांच्या अखत्यारीत ठेवण्यात आला आहे. इतक्या गुप्त आणि गोपनीय तपासामुळे या ड्रग्ज प्रकरणातील गूढ वाढले असून तालुक्यातील मोठे कनेक्शन थेट मुंबई आणि बॉलीवूड प्रकरणाशी असल्याच्या उलट सुलट चर्चा सध्या होत आहेत.

या प्रकरणात कारवाई नेमकी काय? छाप्यात नेमके कोणता अमली पदार्थ सापडला? याचा तपशील आज तपासणी पूर्ण झाल्यावरच कळण्याची शक्यता आहे. कुणाची तपासणी केली? तपासणीत किती माल सापडला?, या प्रकरणाशी आणखी कुणाचा संबंध आहे का? याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. मुंबईतल्या तस्करीचा थेट संबंध ढोलगरवाडीशी आल्याने पंचक्रोशीत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांच्या अचानक पडलेल्या छाप्याने ढोलगरवाडीत खळबळ उडाली आहे.

चंदगड तालुका अत्यंत दुर्गम आणि शांत अशी ओळख आहे. त्यात ढोलगरवाडी गावाचे नाव राज्यात पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे, सर्प जनजागृती आणि येथील परंपरेसाठी ओळखले जाते. अशा या गावात अंमली पदार्थ तस्करीचा वास लागल्याने मुंबई क्राईम ब्रांचच्या विशेष पथक ढोलगरवाडीत दाखल झाले. नेमके काय प्रकरण आहे याबाबत अद्याप लोकांना निटशी माहिती झालेली नाही. तसेच इतके दिवस या ठिकाणी काय प्रकार सुरू होता याबाबतही लोक अनभिज्ञ आहेत. तसेच याबाबत घटनास्थळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी तपास अपूर्ण असल्याचे सांगितले होते. आता विशेष पथक मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळत असून अद्यापही या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

About Belgaum Varta

Check Also

पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली!

Spread the love  पाणी पातळीत वाढ होत राहिल्यास नागरिकांनी वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *