चिक्कोडी : केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या बेजबाबदार आणि चिथावणीखोर विधानामुळेच शिमोग्यात हिंदुत्ववादी कार्यकर्ता हर्ष याची हत्या झाल्याचा घणाघाती आरोप रायबागचे आ. पी. राजीव यांनी केला. चिक्कोडीतील जयप्रकाश नारायण सभागृहात भाजपतर्फे बजरंग दल कार्यकर्ता हर्ष याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना आ. पी. राजीव यांनी डी. के. शिवकुमार यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले, डी. के. शिवकुमार यांनी बेजबाबदार विधान केल्यानेच हर्षसारख्या राष्ट्रभक्ताला गमावण्याची वेळ आली. शिमोग्यात राष्ट्रध्वज उतरवून भगवा ध्वज फडकावल्याचे विधान त्यांनी केल्यानेच प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा जीव गेला अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस जनाधार गमावत असल्याने काही विशिष्ट लोकांच्या तुष्टीकरणासाठी जातीय दंगली घडवीत आहे. हर्षची हत्या केलेल्यांचे काँग्रेस नेते समर्थन करत आहेत हे खेदजनक आहे. या परिस्थितीत आम्ही राष्ट्रीय अस्मिता जपण्याचे कार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.
यावेळी बोलताना भाजपचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली म्हणाले, राज्यात हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहेत हे निषेधार्ह आहे. हर्षच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. राष्ट्राची अखंडता जपण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे नेर्ली यांनी सांगितले. दरम्यान, हर्षच्या हत्येच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी चिक्कोडीतील बसव चौकात निदर्शने करून काँग्रेस विरोधात संताप व्यक्त केला. यावेळी चिक्कोडी नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, उपाध्यक्ष संजय कवटगीमठ, सतीश अप्पाजीगोळ, धुंडप्पा भेंडवाड, शाम्भवी अश्वथपूर, संजीव पाटील, अमृत कुलकर्णी, अप्पासाब चौगले, रमेश काळन्नवर आदी उपस्थित होते.
