बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेने शहरातील भटकी कुत्री पकडण्यासाठी 3 वर्षांत तब्बल 47 लाख, 55 हजार 556 रुपये खर्च केले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मिळवून उजेडात आणली आहे.
बेळगाव मनपाने 2014-15, 2017-18 आणि 2019-20 या 3 वर्षांत आपल्या हद्दीतील भटकी कुत्री पकडण्यासाठी एवढा प्रचंड खर्च केला आहे. याबाबत पत्रकारांना माहिती देताना माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी सांगितले की, मनपाने 3944 भटकी कुत्री पकडून अन्यत्र सोडण्यासाठी 2014-15 मध्ये 25 लाख 65 हजार 805 रुपये खर्च केले. 2017-18 मध्ये 972 कुत्री पकडण्यासाठी 6 लाख 97 हजार 220 रुपये तर 2019-20मध्ये 1598 कुत्री पकडण्यासाठी 14 लाख 95 हजार 531 रुपये खर्च केले आहेत. सगळा हिशेब घालता, एक भटके कुत्रे पकडण्यासाठी 730 रुपये खर्च आल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे मनपा आरोग्याधिकारी, पशु वैध्यकीय निरीक्षक आणि कर्मचार्यांचाही याकामी उपयोग केला असल्याचे सांगितले आहे. एकंदर, भटकी कुत्री पकडण्यासाठी मनपाने लाखो रुपये खर्च केले आहेत हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
