Saturday , June 14 2025
Breaking News

पूर नियंत्रणासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे करावीत : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love

 

मान्सूनपूर्व तयारीबाबत जिल्हा व तालुकास्तरावरील विभागांचा आढावा

कोल्हापूर : येणाऱ्या पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ‘मागील वर्षी पूरस्थितीत मागील अनुभवाच्या आधारे राबवलेल्या उपाययोजना उपयुक्त ठरल्या होत्या. यावर्षीही त्या अनुभवाच्या आधारे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. ‘या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह सर्व विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. तालुका पातळीवरून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

यावेळी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने संपूर्ण पूर व्यवस्थापनाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करून राज्य शासनास सादर केला असून, अशा प्रकारचा आराखडा सादर करणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांचे अभिनंदन केले.

या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या. यात १५ जूनपासून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कोणत्याही विभागातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या घेऊ नयेत. सर्व अधिकाऱ्यांचे व कार्यालयांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करून यादी तयार करावी. पाटबंधारे विभागाने स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्याची खात्री करावी. सर्व नियंत्रण कक्षांनी तहसील कार्यालयाशी समन्वय ठेवून नियोजन करावे. सांगली आणि अलमट्टी धरण प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून योग्य माहिती वेळेवर पुरवावी अशा सूचना केल्या. पर्यटनस्थळांवर (दूधगंगा, राधानगरी धरण, धबधबे) सुरक्षा उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. महानगरपालिकांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्णवेळ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत आणि २० मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करावी. सर्व नियोजित निवारागृहांची यादी तयार करून आवश्यक सुविधा तपासाव्यात. नदी व नाल्यांच्या काठावर अनधिकृतपणे राहणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्यांना तातडीने नोटीस देऊन जागा रिकामी करण्यास सांगावे. पंचनामे करताना छायाचित्रे आणि व्हिडिओ पुरावे घेणे बंधनकारक करावे. रस्ते बंद झाल्यास नागरिकांना तत्काळ माहिती देण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी. आरोग्य विभागाने गरोदर माता, नवजात बालके, औषधसाठा यासंबंधी नियोजन पूर्ण करावे. गरोदर महिलांचे स्थलांतर वेळेत करावे आणि नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे. पशुसंवर्धन विभागाने चारा पुरवठादार व दर निश्चित करून गावनिहाय यादी तयार करावी आणि २५ मेपूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करून अहवाल सादर करावा. सर्व नियंत्रण कक्षांसाठी वीज, दूरध्वनी, मनुष्यबळ आदी सुविधा कार्यरत आहेत याची खात्री करावी असेही यावेळी ते म्हणाले.

तालुका पातळीवरील नियोजन बैठकीतून तालुका आराखडा ३१ मेपूर्वी सादर करावा. ४८८ निवारागृहांतील शौचालय, वीज, मोबाईल चार्जिंग स्टेशनसह आजूबाजूचे जमिनीचे समतलीकरण, दुरुस्ती कामे वेळेत पूर्ण करावीत. आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध साहित्य योग्य स्थितीत आहे का, याची खात्री करावी. ‘आपदा मित्र’ या स्वयंसेवकांचे योग्य प्रकारे कार्यात सहभागी करून घ्यावे याबाबत त्यांनी सूचना केल्या. सुरूवातील प्रसाद संकपाळ यांनी मागील काळातील कामकाजाचे सादरीकरण केले.

About Belgaum Varta

Check Also

“गोकुळ”च्या चेअरमनपदी मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची निवड

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापूर येथील गोकुळ दूधसंघाच्या चेअरमनपदी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *