Saturday , August 29 2026
Breaking News

आनंदवार्ता! १ जूनला मॉन्सून केरळमध्ये होणार दाखल

Spread the love

 

पुणे : उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याने आता संपूर्ण देशाचे लक्ष मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. दक्षिण गोलार्धातील हवामानातील बदल आणि हिंदी महासागर परिसरात तयार होत असलेल्या अनुकूल वातावरणामुळे यंदाच्या नैर्ऋत्य मॉन्सूनच्या वाटचालीला वेग मिळत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. भारतीय उपखंडाकडे मॉन्सून सरकण्याची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचत असून, केरळ किनारपट्टीवर १ जूनच्या आसपास मॉन्सून दाखल होण्याची शक्यता अधिक बळकट होत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने २०२५-२६ चा उत्तर ऑस्ट्रेलियातील पावसाळी हंगाम अधिकृतरीत्या संपल्याची घोषणा केली आहे. हवामानशास्त्रानुसार, ऑस्ट्रेलियातून मॉन्सून माघारी फिरल्यानंतर उत्तर गोलार्धातील वातावरणीय हालचालींना वेग येतो. याच प्रक्रियेमुळे भारतीय महासागर परिसरात कमी दाबाच्या पट्ट्यांची निर्मिती होऊन भारतातील मॉन्सूनसाठी पोषक स्थिती तयार होते.

सध्या ‘इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन’ म्हणजेच ITCZ हा कमी दाबाचा पट्टा उत्तर दिशेकडे सरकत आहे. हा पट्टा मालदीवच्या उत्तरेकडून दक्षिण श्रीलंका आणि अंदमान-निकोबार बेटांपर्यंत विस्तारलेला दिसत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मॉन्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचण्यापूर्वी वातावरणात दिसणारा हा अत्यंत महत्त्वाचा बदल मानला जातो. त्यामुळे येत्या काही दिवसांत मॉन्सूनच्या हालचाली अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दक्षिण भारतातील पुढील ७ दिवस अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तमिळनाडू, केरळ, पुदुचेरी, माहे, कराईकल तसेच दक्षिण कर्नाटकात पुढील काही दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि लक्षद्वीप परिसरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, उत्तर-पश्चिम आणि पूर्व भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून काही भागांत अचानक मेघगर्जना, विजा आणि गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणार; लाल किल्ल्यावरून मोदींचा निर्धार

Spread the love नवी दिल्ली : देशभरात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *