Saturday , June 27 2026
Breaking News

स्मार्टफोनच्या जगात पालकांचे आत्मपरीक्षण; ‘ताराराणी’त मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौतुकास्पद पाऊल!

Spread the love

 

खानापूर : खानापूर येथील मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात २४ जून २०२६ रोजी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींच्या पालकांसाठी आयोजित करण्यात आलेला मेळावा केवळ एक उपचार न ठरता, पालकांना अंतर्मुख करायला लावणारा एक अनोखा आणि अनुकरणीय सोहळा ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. अरविंद पाटील हे होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि संस्थेचे दिवंगत माजी अध्यक्ष शिक्षण महर्षी,बहुजन उध्दारकर्ते कै श्री. नाथाजीराव हलगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भावपूर्ण ईशस्तवन गीताने वातावरणात एक वेगळीच सकारात्मकता निर्माण केली, ज्यानंतर सर्व पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
हा मेळावा पारंपरिक सभेच्या पलीकडे जाऊन पालकांच्या भूमिकेवर थेट प्रकाश टाकणारा ठरला. प्रास्ताविकात प्रा. एस. सी. कणबरकर यांनी शिक्षक-पालक-विद्यार्थिनी या त्रिसूत्रीची गरज स्पष्ट करत पालकांच्या उत्तरदायित्वाची जाणीव करून दिली. पालक प्रतिनिधी श्री. संतोष सावंत यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि केवळ शिक्षकांवर विसंबून न राहता मुलींच्या अभ्यासाकडे पालकांनी जातीने लक्ष दिले पाहिजे, तरच निकाल सुधारेल अशी स्पष्ट कबुली दिली. महिला पालक प्रतिनिधी सौ. तुळसा चौगुले यांची उपस्थिती या मेळाव्याला लाभली. दुसऱ्या महिला प्रतिनिधी रुबिया सनदी यांनी बदलत्या काळाचे आव्हान पालकांसमोर ठेवले. आजच्या युगात मुलींवर चांगले संस्कार करणे, त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करणे आणि स्वतःच्या कष्टाने यश मिळवण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अत्यंत प्रभावी आणि कडक शब्दांत पालकांना पटवून दिले.
या मेळाव्याचे सर्वात अनोखे आणि अनुकरणीय वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे प्रा. टी. आर. जाधव यांनी केलेले मार्गदर्शन. त्यांनी आजच्या पिढीला विळखा घालणाऱ्या ‘मोबाईलच्या अतिवापरा’वर थेट बोट ठेवत पालकांना सतर्क राहण्याचे जाहीर आवाहन केले. केवळ तक्रार न करता परीक्षेच्या चाचण्या आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासात पालकांचा प्रत्यक्ष सहभाग कसा असावा, याचे थेट आणि व्यावहारिक नियोजन त्यांनी मांडले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य अरविंद पाटील यांनी रामायण आणि महाभारतातील समर्पक दाखले देत पालकांना थेट अंतर्मुख करणारे प्रश्न विचारले. ते म्हणाले, “आज स्मार्टफोनच्या जगात आपण आपल्या पाल्यांना नक्की काय देत आहोत? केवळ भौतिक सुविधा पुरवणे म्हणजे आपली जबाबदारी संपली का? आपली मुलगी दिवसभरात काय शिकली, तिला काय अडचणी आहेत, हे जाणून घेण्यासाठी आपण कधी तिच्याशी हक्काने संवाद साधतो का?” पालकांना केंद्रबिंदू मानून मार्गदर्शन करताना त्यांनी एक अत्यंत सुंदर रूपक मांडले. ते म्हणाले, “पालक म्हणजे बागेचा माळी असतो. बागेत वाढणारे अनावश्यक तन काढून टाकणे, तिथली साफसफाई करणे आणि रोपट्याला योग्य खतपाणी देणे हे माळ्याचे म्हणजेच पालकांचे काम आहे. त्या रोपट्याला येणारी फुलं आणि फळं ही सर्वस्वी तुमच्या पाल्यांची कौशले असणार आहेत. त्यामुळे माळ्याची भूमिका चोख बजवा.” पुढे बोलताना त्यांनी पालकांना आपल्या मुलींच्या दैनंदिन शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष ठेवण्याचा मोलाचा सल्ला दिला व गरज पडल्यास पालकांनी स्वतः महाविद्यालयात येऊन शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे, हा त्यांचा संदेश पालकांच्या मनाला भिडला.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी महाविद्यालयातील प्रा. पी. व्ही. कर्लेकर, प्रा. व्ही. एम. गावडे, प्रा. नितीन देसाई, प्रा. श्रीमती जे. एफ. शिवटणकर यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापिका एम. वाय. देसाई यांनी केले. विद्यार्थिनींचे गुण वाढवण्यासाठी केवळ शाळा-कॉलेज पुरेसे नसून, घरामध्ये पालकांनीही आत्मचिंतन करून अभ्यासाचे व संस्कारांचे वातावरण तयार करणे किती गरजेचे आहे, हे अत्यंत तीव्रतेने अधोरेखित करणारा हा मेळावा इतर शैक्षणिक संस्थांसाठी निश्चितच अनुकरणीय ठरेल.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शिवाजीनगरात दोन दुचाकींची भीषण धडक; सेवानिवृत्त पोस्टमास्तर गंभीर जखमी

Spread the love  खानापूर : खानापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात सोमवारी (दि. २२ जून २०२६) दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *