चिकोडी जिल्ह्यातील समाज बांधवांचा सहभाग : एसटी आरक्षणाची मागणी
निपाणी (वार्ता) : धनगर समाज हा विकासापासून वंचित आहे. समाजाच्या प्रगतीसाठी अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस करावी, या मागणीसाठी बेळगाव येथे सुरू असलेल्या अधिवेशनात कर्नाटक प्रदेश कुरुबर संघ, कर्नाटक राज्य हालुमत महासभा, आणि बेळगाव जिल्हा धनगर समाज संघटनेतर्फे मंगळवारी (ता.२७) बेळगाव येथे विधानसौदसमोर सत्याग्रह करून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व कर्नाटक राज्य धनगर समाजाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह समाजातील पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
यापूर्वी जगद्गुरु निरंजनानंदपुरी स्वामींच्या उपस्थितीत कागीनेले ते बंगळुरू पदयात्रा काढून कर्नाटक सरकारला याबाबत निवेदनाद्वारे विनंती केली होती. कुल शास्त्रीय अध्ययन संस्थेने राज्यात धनगर समाजाचे जीवनक्रम, शिक्षण, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीची माहिती, अनुसूचित जमातीसाठी लागणाऱ्या सर्व अटी समाजाने पूर्ण केले आहेत. त्याबाबतचा अहवाल कर्नाटक शासनाकडे सुपूर्द केला आहे. राज्य सरकारने बेळगाव येथील अधिवेशनात त्याची शिफारस त्वरित केंद्राकडे करावी. अशा मागण्यांचे निवेदन ही मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. मंगळवारी (ता.२७) सकाळी १० वाजता येथील शासकीय विश्रामधामावर समाजबांधव एकत्रित येऊन ११ वाजता बेळगावच्या दिशेने रवाना झाले होते.
बेळगाव येथील मोर्चामध्ये कर्नाटक प्रदेश धनगर समाजाचे राज्याध्यक्ष सुब्रमण्यम, प्रधान कार्यदर्शी व्यंकटेश मूर्ती, कार्यदर्शी के. एम. रामचंद्रअप्पा, बेळगाव जिल्हा धनगर समाज अध्यक्ष मड्याप्पा तोळण्णावर निपाणी तालुका धनगर समाजाचे उपाध्यक्ष श्रीकांत बन्ने, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आरगे, महादेव कौलापूरे कल्लाप्पा डोणे, ग्रामपंचायत सदस्य रामा बन्ने, चंद्रकांत मुधाळे, मंजुनाथ हिरवे, सिद्राम पुजारी सिद्धलिंग चिगरे, बाबाजी बन्ने, अविनाश हजारे, दत्ता ढवणे, लक्ष्मण जानकर, राजू बन्ने, वासू रानगे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.