कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील कोगनोळी टोलनाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर 8 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना देण्यासाठी भेटवस्तू, रोकड आदीसह अन्य वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी कर्नाटक प्रशासनाने तपासणी नाका उभा केला आहे.
मंगळवार तारीख 9 रोजी मध्यरात्री 1च्या सुमारास मुंबईहून दावणगिरीकडे जात असलेली बस क्रमांक जीए 08 व्ही 8727 गाडीची तपासणी केली असता यामध्ये 7 लाख 94 हजार रुपयेची रोकड असल्याचे निदर्शनास आले. सदर रकमेबद्दल कोणतेही प्रकारची कागदपत्रे सादर न केल्याने रक्कम जप्त करण्यात आली.
सदर कारवाई मध्ये निपाणी मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी, बाळासाहेब कंळत्रे यांच्यासह महसूल विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.