माजी आमदार काकासाहेब पाटील; काँग्रेस कार्यालयात बैठक
निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मतदारांना अनेक योजनांची गॅरंटी दिली होती. सरकार सत्तेवर येताच त्याची अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीमध्ये महिलासह सर्व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली. बुधवारी (ता. २४) सायंकाळी काँग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
काकासाहेब पाटील म्हणाले, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या दौऱ्यामध्ये भाजपमध्ये असलेले माजी नगरसेवक राज पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हे वातावरण काँग्रेसला उपयुक्त ठरत आहे. शहर आणि ग्रामीण भागातून दररोज प्रचारसभांना वाढता पाठिंबा मिळत आहे. प्रचारासाठी प्रियांका गांधी येणार आहेत.त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी याच विजयी होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी, गॅरंटी योजनामुळे विरोधी पक्षाच्या नेते मंडळींनी सूचना करूनही मतदार संघात काँग्रेसला वातावरण पोषक ठरले आहे. काँग्रेस सरकारने महिला सबली करणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. गॅरेंटी योजना बाबत प्रत्येक तालुक्यात समितीची स्थापना केली असून सरकारने त्याला मान्यता दिली आहे. गॅरेंटी योजनाबाबत घरोघरी जाऊन चौकशी करून लाभ दिला जात असल्याचे सांगितले.
यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, नगरसेवक बाळासाहेब देसाई- सरकार, डॉ. जसराज गिरे, सुजय पाटील, प्रतिक शहा, अनिस मुल्ला यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.