कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील सुळगाव, मत्तीवडे, हणबरवाडी, हंचिनाळ के.एस, हदनाळ, आप्पाचीवाडी आदी भागात भात, सोयाबीन, हायब्रीड, भुईमूग ही पिके घेण्यासाठी बळीराजा पूर्व मशागत करण्यात मग्न झाला आहे. या परिसरात मशागतीसाठी उपयुक्त पाऊस झाला असल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे.
यंदा ऊस पिकाऐवजी शाळू, मका, उन्हाळी भुईमूग या पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले होते. शाळू, मका, भुईमूग ही पिके घेतली असून याच जमिनीत भात, सोयाबीन, भुईमूग ही पावसाळी पिके घेण्यासाठी ट्रॅक्टर, नांगरट, रोटर, बांडगे, कोळवट करणे आदी कामात शेतकरी मग्न आहेत. प्रत्येक गावात एक-दोन बैलजोडी असल्याने बैलांच्या अपुऱ्या संख्येमुळे शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणाकडे कल दिसून येत आहे.
यंदा दूधगंगा नदीकाठचे प्रत्येक गावातील ऊस क्षेत्र घटल्यामुळे पुढील गळीत हंगामात साखर कारखान्यांना ऊसाची टंचाई भासणार आहे. काळम्मावाडीच्या पाण्याची गळती काढण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र गळती कधी काढणार? याबाबत अजूनही शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.