निपाणी (वार्ता) : गोरेगाव (मुंबई) येथील मनीषा मेहता यांच्या कॅनडास्थित भगिणी स्वप्ना तेंडुलकर यांनी येथील उद्यानाला पर्यावरण दिनानिमित्त २५ हजार रुपयांची विविध प्रकारची रोपे दिली. पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले आणि शिक्षिका अपूर्वा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.
येथील लेटेक्स कॉलनीमधील नियोजित विश्वकर्मा उद्यानामध्ये पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या हस्ते रोपे लावण्यात आली. पर्यावरणाचा समतोल टिकून राहण्यासाठी तेंडुलकर यांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे नामदेव चौगुले यांनी सांगितले. अपूर्वा चौगुले यांनी, कॅनडामध्ये राहत असूनही मातृभूमीत वृक्षारोपण करण्याचा निर्णय समाजाला आदर्शवत असल्याचे सांगितले. यावेळी सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे अध्यक्ष फिरोज चाऊस, प्रकाश सुतार, संजय सुतार, रामचंद्र सुतार, अमोल सुतार, बाळासाहेब सुतार, विकास कुणकेकर, रविप्रसाद आवटे, प्रथमेश सुतार, आनंद उत्तुरे उपस्थित होते.