निपाणी (वार्ता) : मराठी भाषेची निर्मिती ही शके ९०५ मध्ये लिहिलेल्या गोमटेश्वराच्या शिलालेखाद्वारे स्पष्ट होते. सुमारे अडीच हजार वर्षे प्राचीन व समृद्ध वारसा लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ही घटना मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद आहे. आता राज्यासह सीमा भागातील बंद पडलेल्या मराठी माध्यमाच्या शाळांना संजीवनी मिळावी अशा आशयाचे पत्रक माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकातील माहिती अशी, संस्कृत ही देवभाषा आहे. मराठी ही सर्वसामान्यांची भाषा होती. तर ज्ञानदेवांनीही अमृतालाही पैजेसी जिंकणारी मराठी स्वीकारली. फादर स्टीफन सारख्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी मराठीचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्य व्यवहार कोष मराठीत रचला. अष्टप्रधान मंडळातील संस्कृत नांवे मराठीत केली. अशी सर्वमान्य व लोकमान्य असलेल्या या आपल्या मायबोली मराठी भाषेला २० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तिच्या समृद्धीवर राज्य मान्यतेचे मोहोर उमटली.
मराठी ही अभिजात होती अजूनही आहे. पण आता ती राजपत्रित अभिजात झाली आहे. त्या अनुषंगाने मराठी माध्यमाच्या शाळा फुलविता येतील का? केंद्र सरकार कडून अभिजात मराठी भाषा प्रचार, प्रसार व समृद्धीसाठी वर्षाला १०० कोटी रुपये अनुदान मिळणार आहे. त्यासाठी ही अनुदान मराठी माध्यमाच्या शाळांच्या जीर्णोद्धारासाठी खर्च करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रासह सीमाभागातील मराठी भाषा आणि शाळा नामशेष होण्याची भीती आहे. त्यासाठी मराठी भाषेला मिळालेली अभिजात संजीवनी ही मातृभाषा मराठीची विद्यामंदिरे फुलवण्यासह मराठी शाळा टिकणार आहेत. त्यासाठी मराठी भाषिकांनी पुढे यावे, असे आवाहनही प्रा. चिकोडे यांनी पत्रकांन्वये केले आहे.