निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेची २४ तास पाणी योजना देखभालीचे काम जैन इरिगेशन कंपनीला देण्यात आले आहे. एप्रिल २०२३ पर्यंतच्या कामाचे बिल पालिकेने कंत्राटदारांना दिले आहे. त्यानंतर दोन वर्षापासून कोणतीच रक्कम दिलेली नाही. तरीही पालिकेच्या आदेशानुसार अतिरिक्त पाईपलाईन टाकली आहे. पण दोन वर्षापासून गळती दुरुस्ती व इतर कामांचे बिल ३ कोटी ५० लाख ते ४ कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. नगरपालिकेने तात्काळ थकीत रक्कम देण्याची मागणी कंत्राटदार जैन इरिगेशन कंपनीने केली आहे.
कंत्राटदारांनी दिलेली माहिती अशी, जैन इरिगेशन कंपनीतर्फे दरमहा ग्राहकांनी वापरल्या पाण्याचे बिल नळधारकांना पोहोच करतात. त्यानुसार ग्राहक नगरपालिकेत पाण्याचे बिल भरत आहेत. नगरपालिका बिलाची रक्कम घेऊनही आपल्याला थकीत बिले दिली जात नाहीत. त्यामुळे दुरुस्ती व इतर कामे करणे कठीण झाले आहे. शिवाय या योजनेवर काम करणाऱ्या ४० कर्मचाऱ्यांना वेतन देणे अशक्य झाले आहे. परिणामी कर्मचारी संपावर जात असल्याने पाणीपुरवठा सुरळीत करणे अडचणीचे ठरत आहे.
नगरपालिकेकडून येणाऱ्या थकित बिलाबाबत नगरपालिका आयुक्त आणि केयुआयडीएफसी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पण आजतागायत थकीत बिल मिळालेले नाही. तरी जिल्हाधिकारी, नगरपालिका आयुक्तांनी गांभीर्याने विचार करून थकबाकी तात्काळ देणे आवश्यक आहे. तसे झाल्यास पाणीपुरवठा बाबतची कामे करणे शक्य होणार आहे.
नगरपालिका प्रशासनाने निधी नसल्याचे सांगून कंपनीची बिले थकीत ठेवली आहेत. त्यामुळे कामगारांसह संबंधित अधिकाऱ्यांचे वेतनही मिळालेले नाही.
नगरपालिकेला राज्य शासनाकडून विविध कामांसाठी निधी दिला जातो. याशिवाय राखीव निधी ही ठेवला जातो. अशा निधीतून थकीत बिल द्यावे, असेही जैन इरिगेशन कंपनीचे अधिकारी लक्ष्मीकांत यांनी म्हटले आहे.