निपाणी : येथील नगरपालिका क्षेत्राची हद्दवाढ झाली आहे. पाच ग्रामपंचायत हद्दीतील एकूण ७५ सर्व्हे नंबर नगरपालिका हद्दीत आले आहेत. त्यामुळे नगरपालिकेची सध्या असणाऱ्या ३१ प्रभागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाविष्ट झालेल्या सर्व्हे नंबरमधील मतदारांची नावे ग्रामपंचायतीमधून कमी करून नगरपालिका मतदार यादीत नोंद केल्यानंतरच नगरपालिका निवडणुका घ्याव्यात, अशा मागणीचे निवेदन ४-जेआर ह्युमन राईटस् केअर ऑर्गनायझेशनतर्फे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. हद्दवाढ झाल्यामुळे नगरपालिकेला राज्य सरकारकडून विकासकामांसाठी वाढीव निधी देखील येणार आहे. त्यामधून सार्वजनिक रस्ते, गटारी, पथदीप, खुल्या जागावर उद्यान, स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी अशा सुविधांसाठी प्रभागातील नगरसेवकांकडे मागण्या करू शकतील, असेही निवेदनात म्हटले आहे.