Monday , May 25 2026
Breaking News

आध्यात्मिक प्रगतीसाठी दत्तपाठ पुस्तकेचा उपयोग

Spread the love

 

परमात्माराज महाराज ; पुस्तक प्रकाशन सोहळा

निपाणी (वार्ता) : भगवान् दत्तात्रेय स्वरूप हे दत्तपाठ समन्वयस्वरूप आहे. विविध संप्रदायांना एकत्र आणून व्यावहारिक जीवनातील अडचणी दूर करून आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी दत्तपाठ या सत्संग्रह रूपिणी पुस्तिकेचा उपयोग निश्चितच होणार आहे, असे मत परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्री दत्त देवस्थान मठा तर्फे आयोजित श्रीदत्तपाठ या सत्संग्रह रूप पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सकाळी श्री दत्त मंदिरात श्रीदत्त चरणांवर अभिषेक अर्पण करून महाआरती झाली. त्यानंतर नामजप झाला. यावेळी परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते दत्तपाठ नामक सत्संग्रह पुस्तिकेचे प्रकाशन झाले. यावेळी भाविकांनी श्री गुरुदेव दत्त..! असा एकच जयघोष केला. परमात्मराज महाराज म्हणाले, “दत्तात्रेय स्वरूप हे प्रामुख्याने समन्वयाचे स्वरूप आहे. त्यामध्ये ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव या तिन्ही देवांचे एकत्रित रूप सामावलेले आहे. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यानुसार या तीन रूपांच्या अनुषंगाने वैधस, वैष्णव आणि शैव अशा विविध विचारधारा व त्या अंतर्गत अनेकानेक संप्रदाय निर्माण झाले आहेत.विविध संप्रदायांना एकत्र आणण्याचे काम दत्तात्रेय हे समन्वय स्वरूप सूत्र करते. या समन्वयाशिवाय विविध पंथांमध्ये कधीही एकता निर्माण होऊ शकत नाही. दत्तपाठ हा कोणत्याही एका विशिष्ट संप्रदायाचा मर्यादित पाठ नसून, तो एक ‘समन्वय पाठ’ आहे. यामध्ये सर्व जाती, धर्म आणि संप्रदायांच्या लोकांसाठी जागा आहे. केवळ हिंदूच नव्हे, तर ख्रिश्चन आणि मुसलमान धर्मातील थोर महापुरुषांनाही दत्तगुरूंचा आशीर्वाद लाभल्याचे महाराजांनी सांगितले.
यावेळी आश्रमस्थ साधू आणि मान्यवरांना श्री दत्तपाठ पुस्तिकेचे वितरण परमात्मराज महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अरुण खोत- पुणे, अनिल जाधव- कोल्हापूर, अनिल खोत -शिवापुरवाडी, राहुल कुंभार- इचलकरंजी, अभियंते विठ्ठल मगदूम, सचिन रणनवरे -शेंडर यांचा सत्कार झाला. यावेळी नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अमोल महाराज, मारुती महाराज, चिदानंद महाराज, समाधान महाराज, श्रीधर महाराज, मल्लेश बन्ने, शिवाजी लोखंडे व आश्रमस्थ विद्यार्थ्यासह आडी, बेनाडी, कोगनोळी, सौंदलगा, हणबरवाडी, हंचिनाळ, बेलवळे, अकिवाट, कागल, शिरोळ, निपाणी, म्हाकवे, आणूर, कोडणी, गडहिंग्लज, चिखली, एकोंडी, पिंपळगाव, बेळगाव, कोल्हापूर, पुणे व परिसरातील भाविक उपस्थित होते. विठ्ठल खोत यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *