


निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, निपाणी विभागाच्या वतीने आज (सोमवार) कुरली, सौंदलगा आणि हालसिद्धनाथनगर (सौंदलगा) येथील मराठी मुलांची व मुलींची शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती गेल्या पाच वर्षांपासून हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवत आहे. मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला प्रोत्साहन मिळावे, मराठी शाळा अधिक सक्षम व्हाव्यात तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यंदा शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी तमिळनाडू राज्यातील अरुण रेगा बेकरी मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड, कोईमत्तूर यांचे ५०० शैक्षणिक किटचे विशेष सहकार्य लाभले. या सहकार्यासाठी निपाणी तालुका समितीचे अध्यक्ष अजित पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, निपाणीचे अध्यक्ष संतोष निढोरे, उपाध्यक्ष गणेश माळी तसेच सदस्य नेताजी बेलवळे, अजित पाटील, दिनकर पाटील, दीपक पाटील, किरण मगदूम, पिंटू पाटील, संदीप शिंदे, प्रतीक पाटील, शिवम पाटील, अमोल पाटील आणि आदित्य पाटील उपस्थित होते.
याशिवाय दोन्ही शाळांचे एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Belgaum Varta Belgaum Varta