


बंगळुरू : कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार सोमवारी पार पडला. राजधानी बंगळुरू येथील लोकभवनात आयोजित शपथविधी सोहळ्यात एकूण १९ नव्या मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये या विस्तारामुळे मंत्रिमंडळाला अधिक बळ मिळाले आहे. शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.


शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये डॉ. अजय धर्मसिंग, एच. सी. बालकृष्ण, के. एस. बसवंतप्पा, बसवराज रायरेड्डी, एन. चेलुवरायास्वामी, लक्ष्मण सवदी, मधू बंगारप्पा, एस. एस. मल्लिकार्जुन, डी. नागेंद्र, पी. एम. नरेंद्रस्वामी, पुट्टुरंग शेट्टी, टी. रघुमूर्ती, रिझवान अर्शद, रुद्रप्पा लमाणी, संतोष लाड, के. एम. शिवलिंगेगौडा, शिवराज संगडगी, विजयानंद काशप्पनावर आणि बी. झेड. जमीर अहमद खान यांचा समावेश आहे.
या शपथविधी सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक मंत्र्यांनी ईश्वर, महापुरुष, आपल्या आई किंवा ज्येष्ठांच्या नावाने शपथ घेतली. त्यामुळे सोहळ्यात भावनिक वातावरण निर्माण झाले.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता सर्वांचे लक्ष खातेवाटपाकडे लागले आहे. नव्या मंत्र्यांना कोणती महत्त्वाची खाती मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. सरकारकडून लवकरच खातेवाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळातील एक जागा अद्याप रिक्त ठेवण्यात आली असून, त्या जागेवर महिला आमदाराला संधी दिली जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या विस्तारामुळे राज्य सरकारच्या प्रशासनाला अधिक गती मिळेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta