


बेळगाव : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी सोमवारी बेळगावजवळील हिरेबागडेवाडी टोल नाक्यावर तीव्र आंदोलन छेडले. समर्थकांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करत रस्ता रोखल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
आंदोलनकर्त्यांनी काँग्रेस हायकमांड तसेच राज्य नेतृत्वाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ग्रामीण भागावर अन्याय झाल्याचा आरोप केला. लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांची निवड न झाल्याने समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
आंदोलनादरम्यान दर्गा अज्जनवर यांनी सांगितले की, “हिरेबागडेवाडी परिसरातून काँग्रेसला प्रथमच प्रतिनिधित्व मिळाले. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल, असा विश्वास होता. मात्र ग्रामीण भागावर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.”
तसेच, “राहुल गांधी ग्रामीण विकासावर भर देण्याची भूमिका मांडतात. मात्र आमच्या मतदारसंघाला न्याय मिळालेला नाही. लक्ष्मी हेब्बाळकर यांना योग्य स्थान मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील. गरज पडल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Belgaum Varta Belgaum Varta