


तांत्रिक तपासणी पथकाची पाहणी ; परिस्थितीचा अहवाल सादर
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचा कामावेळी खरी कॉर्नर परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामावेळी पोकलँडचा धक्का आणि पावसामुळे भिंत कोसळली. याबाबत घडलेल्या दुर्घटनेबाबत वास्तूस्थिती संबंधितांनी मांडली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने काम करणे अडचणीचे ठरत आहे. पाऊस कमी होताच उर्वरित कामाची पूर्तता केली जाणार आहे.
संबंधित ठिकाणी आर ई वॉल आणि मुख्य कॅरेजवे पोहोच रस्त्याचे काम वेगाने सुरू होते. या कालावधीत, वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली होती. सार्वजनिक वाहतूक विस्कळीत होऊ न,ये म्हणून सेवा रस्त्यावरून सातत्याने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. शिवाय बांधकामाचे कामही सुरू राहिले होते.
निपाणी शहरी भागातील बांधकामासाठी आवश्यक असलेली जमीन दुर्घटनेच्या अवघ्या तीन महिने आधीच हस्तांतरित करण्यात आली होती. त्यामुळे बांधकामासाठी उपलब्ध असलेला कालावधी कमी झाला. याव्यतिरिक्त लोकप्रतिनिधी आणि स्थानिक जनतेची मागणी विचारात घेऊन दोन अतिरिक्त एलव्हीयूपी प्रस्तावित करण्यात आले. त्यामुळे बांधकामाचा क्रम आणि प्रकल्पाच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.
मानक अभियांत्रिकी पद्धती आणि आयआरसीच्या शिफारसींनुसार, सततचा पाऊस आणि पाण्याचा निचरा होण्याच्या धोक्यामुळे पावसाळ्यात भिंतीचे बांधकाम सामान्यतः टाळले जाते. तरीही शहरी भागातील वाहतुकीच्या अडचणी, मुख्य कॅरेजवे तात्काळ पूर्ववत करण्याची आवश्यकता आणि स्थानिक जनतेची गैरसोय कमी करण्यासाठी, प्राधान्यक्रमाने भिंतीचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. २६ जुलै रात्रीच्या पाळीत सबग्रेडचे बांधकाम करत असताना पोकलेन जेसीबी ट्रॅक अनपेक्षितपणे उभारण्यात आलेल्या प्रीकास्ट फ्रिक्शन स्लॅब क्रॅश बॅरियरच्या संपर्कात आला. परिणामी किंचित विस्थापित होऊन बाहेरच्या बाजूला झुकला आणि तिथे पोकळी निर्माण झाली.
प्रकल्प परिसरात पाऊस झाल्याने अपघाती विस्थापनामुळे निर्माण झालेल्या पोकळीतून पावसाचे पाणी आत गेले. परिणामी मातीमध्ये पाणी झिरपून मातीच्या रचनेच्या स्थिरतेवर व परिणाम झाला. त्यामुळे भिंती सरकून ही घटना घडली आहे.
या घटनेनंतर तात्काळ एनएचएआय मुख्यालयाच्या तांत्रिक पथकाने बाधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या निरीक्षणाच्या आधारे रचनेत किंवा बांधकाम पद्धतीमध्ये कोणताही दोष नव्हता. भिंतीसाठी वापरलेल्या साहित्य संबंधित वैशिष्ट्यांशी, आयआरसी मार्गदर्शक तत्त्वांशी आणि मान्यताप्राप्त गुणवत्ता हमी आवश्यकतांशी पूर्णपणे सुसंगत असल्याचे आढळले. वापरलेल्या साहित्याच्या गुणवत्तेत कोणतीही त्रुटी आढळून आली नाही.वरील तथ्ये आणि निरीक्षणांवरून बांधकाम दरम्यान प्रीकास्ट फ्रिक्शन स्लॅब क्रॅश बॅरियरच्या अपघाती विस्थापनामुळे आणि त्यानंतर झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली.ज्यामुळे पोकळीतून पाणी आत झिरपले. परिणामी, किमी ५७२+४७० ते किमी ५७२+४८२ दरम्यानची भिंत सरकली. ज्याचा अंदाजे १२ मीटर लांबीवर आणि सुमारे १ मीटर रुंदीवर परिणाम झाला. तपासणी आणि तांत्रिक निरीक्षणांच्या आधारे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta