


निपाणीत घंटागाडी गाडीची चाके रुतलेलीच
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात प्रत्येक प्रभागात अनेक वर्षांपासून चौकाचौकांत कचराकुंड्या होत्या. त्यामुळे प्रभागामधील नागरिकांना कचरा टाकण्यासाठी उपयोग होत होत होता. आठ-दहा वर्षांपूर्वी सर्वच कचराकुंडी काढून घंटागाड्या सुरू केल्या. मात्र गाड्या वेळेवर येत नसल्याने नागरिक रस्त्याकडेलाच कचऱ्याचे ढीग टाकत आहेत. त्यामुळे रहिवाशांसह पादचाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. काही भागांत डुकरांमुळे कचरा विखरत आहे.
घंटागाडी वेळेवर येत नसल्याने कचरा टाकण्यासाठी नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन कचराकुंडीची मागणी केली आहे.रस्त्यावर कचरा टाकल्याने मलेरिया, डेंगीचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. गजबजलेल्या अशोकनगर परिसरात कचरा संकलनासाठी बकेट होते. पण दोन वर्षापासून ते बकेट गायब झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर टाकलेला कचरा रस्त्यावर विखुरला जात आहे. पालिका प्रशासनाने दररोज घंटागाडीद्वारे कचरा उचलण्याची मागणी होत आहे.
साखरवाडीत बऱ्याच वर्षांपूर्वी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये बांधली आहेत. ती खराब झाल्याने मैला गटारीकडेने रस्त्यावर येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta