


४,७८५ जागांचे आरक्षण निश्चित; महिलांसाठी ५७१ जागा राखीव
बेंगळुरू : राज्यातील बहुप्रतीक्षित जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांना अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. राज्य सरकारने जिल्हा व तालुका पंचायत सदस्यांच्या ४,७८५ जागांचे मतदारसंघनिहाय आणि वर्गनिहाय आरक्षण निश्चित करून विशेष राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने पाऊल पडले असून, राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
राज्यातील ३१ जिल्हा पंचायतींच्या १,१२९ सदस्य जागा, तर तालुका पंचायतींच्या ३,६५६ जागांचे आरक्षण अंतिम करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण ४,७८५ जागांवर कोणत्या प्रवर्गाला संधी मिळणार, याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
महिलांच्या प्रतिनिधित्वाला मोठी झेप
यंदाच्या आरक्षणात महिलांना ५० टक्क्यांहून अधिक प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. जिल्हा पंचायतींच्या १,१२९ जागांपैकी तब्बल ५७१ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकांमध्ये महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे.
कर्नाटक पंचायत राज अधिनियम, १९९३ मधील कलम १६२ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्य सरकारने आरक्षणासंदर्भातील ही अधिसूचना जारी केली आहे. सर्व ३१ जिल्हा पंचायतींच्या सदस्य जागांचे वर्गनिहाय आरक्षण निश्चित झाल्याने निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
इच्छुकांची धावपळ वाढणार
आरक्षण जाहीर झाल्याने अनेक मतदारसंघांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांच्या हालचालींनाही आता वेग येणार आहे. कोणता मतदारसंघ कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाला, यानुसार उमेदवारांची राजकीय गणिते जुळविली जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आयोगाच्या कार्यक्रमाकडे लक्ष
आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करून विशेष राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने आता राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकांची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात करण्याची तयारी केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta