


मराठी भाषिकातून संताप: ऐन सणासुदीच्या काळात व्यवसायिकांची तारांबळ
निपाणी (वार्ता) : निपाणी सीमा भागातील मराठी भाषिकांना कर्नाटक शासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने डिवचण्याचा प्रयत्न सुरूच आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ महत्त्वाचा आहे. पण अशा परिस्थितीत येथील नगरपालिका प्रशासनाने व्यवसायिकांना कन्नड भाषेतील फलक लावण्याची सक्ती बुधवारपासून (ता.१४) सुरू केली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गासह मराठी भाषिकातून संताप व्यक्त होत.
कन्नड भाषेचा सन्मान राखणे आणि स्थानिक भाषेला प्रोत्साहन देणे योग्य आहे. पण निपाणी शहर आणि परिसर मराठी बहुभाषिक आहे. शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा कोणताही उपक्रम राबवताना योग्य वेळ, नागरिकांची सोय आणि व्यापाऱ्यांचे हित यांचाही विचार होणे आवश्यक आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठेत गर्दी वाढलेली असताना अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे व्यापारी आणि नागरिकांना गैरसोय होणार नाही, याची प्रशासनाने काळजी घेण्याची मागणी होत आहे.
निपाणी शहरात मराठी आणि कन्नड अशा दोन्ही भाषांना महत्त्व आहे. त्यामुळे भाषेचा प्रश्न संवेदनशीलतेने हाताळणे गरजेचे आहे. कोणत्याही भाषेचा विरोध हा उद्देश नसून, प्रशासनाने सर्व भाषांचा आदर राखत नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घ्यावेत, हीच अपेक्षा व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.
नगरपालिकेने सणासुदीचा काळ लक्षात घेऊन या उपक्रमाचे नियोजन आधीच करायला हवे होते. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून आणि बाजारपेठेतील परिस्थितीचा विचार करून हा उपक्रम राबवता आला असता. मात्र, ऐन सणाच्या काळातच अशा उपक्रमाला प्राधान्य दिल्याने नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शहरात स्वच्छता, वाहतूक कोंडी, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसारखे अनेक प्रश्न असताना नगरपालिकेने सर्व बाबींना योग्य प्राधान्य देणे आवश्यक आहे. भाषेचा सन्मान राखतानाच व्यापाऱ्यांचे आर्थिक हित आणि सामान्य नागरिकांची सोय यांचाही विचार व्हायला हवा.
भाषेचा सन्मान महत्त्वाचा आहे पण नागरिकांची गैरसोय होत आहे. नगरपालिकेने या उपक्रमाच्या वेळेचा फेरविचार करावा आणि व्यापारी व नागरिकांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शहरवासीयातून व्यक्त होत आहे.
——————————————————————-
‘शहरासह परिसरातील व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायाचे फलक कन्नड मध्ये लावण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका आयुक्तांना दिला आहे. त्यानुसार ही कार्यवाही केली जात आहे. त्याशिवाय ६० टक्के कन्नड फलक आणि इतर भाषेतून ४० टक्के फलक लावण्याची मुभा आहे.’
–विवेक जोशी, अभियंते नगरपालिका, निपाणी
——————————————————————
‘सीमा भागात मराठी भाषेचे वर्चस्व न्यायप्रविष्ठ बनले आहे. असे असताना प्रशासनाने व्यवसायिकांना कन्नड भाषा फलक सक्तीचे करणे चुकीचे आहे. शिवाय व्यवसायिकांना वेठीसस धरणे योग्य नाही. सण संपल्यानंतर सर्व व्यवसायिकांना एकत्रित घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे’.
-जयराम मिरजकर, महाराष्ट्र एकीकरण समिती, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta