


थकीत भाड्यामुळे १३ गाळ्यांना सील : चार लाखांचे भाडे थकित
निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरातील एकूण १३ शासकीय गाळ्यांची सुमारे व्यवसायिकाकडून ४ लाखाचे भाडे थकीत आहे. त्या संदर्भात नगरपंचायतीने बऱ्याच वेळा संबंधित व्यवसायिकांना नोटिसा पाठवूनही थकीत भाडे न भरल्याने नगरपंचायतीतर्फे सर्वच गाळ्यांना सील ठोकून कारवाई केली. त्यामुळे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सुमारे ३० वर्षापूर्वी ग्रामपंचायत काळात हे गाळे बांधण्यात आले होते. त्या काळातील भाडे आजही अत्यल्प असल्याचे सांगितले जात आहे. मुख्या धिकारी स्वानंद तोडकर यांनी, थकबाकीची वसुली करण्यासाठी यापूर्वी चार ते पाच वेळा संबंधित गाळेधारकांना नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र गाळधारकांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.
गाळेधारक शिशिर सातपुते यांनी या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. ही कारवाई अचानक करण्यात आली आहे. गाळेधारकांशी कोणताही संवाद न साधता थेट सील ठोकण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. या कारवाईमुळे लहान व्यापा-यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनणार आहे.
शिवाय अनेक कुटुंबांचे जीवन धोक्यात आल्याचे म्हटले आहे.
व्यापारी गाळ्यांच्या फेरलिलावाची तारीख व अटी याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता फेरलिलाव होणार का? याकडे गाळेधारकांचे लक्ष लागले आहे. नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ याबाबत योग्य ती भूमिका घेण्याची मागणी गाळेधारकातून होत आहे. या कारवाईत मुख्याधिकारी स्वानंद तोडकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल निरीक्षक संदीप वाईगडे, आरोग्य निरीक्षक महेश नंदिकेश्वर, सहाय्यक पोपट कुरळे, अनिल कांबळे, जयपाल नेजे आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Belgaum Varta Belgaum Varta