Wednesday , November 25 2026
Breaking News

निपाणीत १३३ कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याचा पर्दाफाश!

Spread the love

अधिक परताव्याचे आमिष दाखवून नाशिकच्या गुंतवणूकदारांना गंडा; १२ जणांवर गुन्हा, चार आरोपींना जामीन

निपाणी : आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून नाशिक येथील गुंतवणूकदारांची तब्बल १३३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार निपाणी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे गुंतवणूक क्षेत्रात खळबळ उडाली असून, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

नाशिक येथील रहिवासी प्रकाश पितांबर पाटील यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, निपाणीतील निंबाळकर कॉलनी येथे राहणारा प्रसाद तात्यासाहेब पाटील (वय ३४) याच्यामार्फत गुंतवणूक संस्था चालविण्यात येत होती. या संस्थेमध्ये पैसे गुंतवल्यास आकर्षक आणि अधिक परतावा मिळेल, असे आमिष गुंतवणूकदारांना दाखविण्यात आले होते.

या आश्वासनाला बळी पडून प्रकाश पाटील यांच्यासह अनेकांनी संस्थेत मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले. सुरुवातीच्या काळात गुंतवणुकीवर नियमित परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदारांचा संस्थेवरील विश्वास वाढला. मात्र, काही काळानंतर परतावा मिळणे अचानक बंद झाले. वारंवार मागणी करूनही गुंतवणुकीची रक्कम आणि परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचा संशय आला.

तक्रारीत गुंतवणूकदारांकडून जमा करण्यात आलेला निधी वैयक्तिक वापरासाठी वळविण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या माध्यमातून नाशिकमधील गुंतवणूकदारांची सुमारे १३३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी नंदा तात्यासाहेब पाटील, तात्यासाहेब बालगोंडा पाटील, पूनम प्रसाद पाटील आणि पूनम संदीप शिंपुकाडे या चौघांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रसाद तात्यासाहेब पाटील याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचबरोबर गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या अन्य व्यक्तींचाही शोध सुरू आहे. प्रकरणाची व्याप्ती आणि आर्थिक उलाढालीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन स्वतः तपासावर लक्ष ठेवून आहेत.

१३३ कोटी रुपयांच्या या कथित गुंतवणूक फसवणूक प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येतात आणि गुंतवणूकदारांची रक्कम वसूल करण्यात पोलिसांना कितपत यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रधानमंत्री आवास घरकुल संकुलनाला काकासाहेब पाटील यांचे नाव देण्यासाठी निवेदन

Spread the love    निपाणी (वार्ता) : पट्टणकुडी हद्दीतील दाइंगडे मळा येथे प्रधानमंत्री आवास योजना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *