सौंदलगा : सौंदलगा येथे शुक्रवारी रात्री ७ च्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने सौंदलगा गावातील अनेक घरांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी घरांचे पत्रे, जनावरांच्या साठी बांधलेली शेड, घराची कवले उडून गेली आहेत तर कुंभार गल्लीमधील दुसरा मजला बांधकामासाठी उभी करण्यात आलेली मोठी भिंत शेजारच्या घरावर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे नायकुपाटील मळ्यामध्ये मुख्य रस्त्यावर झाड कोसळून रस्ता बंद झाला आहे. गेल्या चार दिवसात दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत होता. संध्याकाळी ढग जमा होऊन विजेचा कडकडाट होत होता पण पाऊस अगदी किरकोळ प्रमाणात पडला होता. पण शुक्रवारी रात्री मात्र विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले या वादळी पावसाने सौंदलगा येथील नवीन बांधत असलेल्या इमारतीवरील बाळासाहेब कुंभार यांचे दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम चालू होते. हे बांधकाम उंची अंदाजे ७ फूट तर ५० फूट लांबी असणारी ही भिंत टप्प्याटप्प्याने काही क्षणात शेजारी असणारे तुकाराम शंकर कुंभार (रा.कोल्हापूर) सध्याच्या घरामध्ये जानू लोहार यांचे कुटुंब राहते. यांच्या घरावर रात्री आठच्या दरम्यान ही भिंत कोसळली. यावेळी घराच्या मागील भागावर भिंतीचा थोडा भाग कोसळला त्यावेळी नवरा बायको घरात होते. पण मागील भिंत घरावर कोसळताच हे दोघेही घरातून बाहेर आले. त्यानंतर राहिलेली संपूर्ण भिंत त्या घरावर कोसळली दोघेही बाहेर आल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. भिंत कोसळल्याने घरामध्ये विटा, कवले, घराचे वासे सर्व विखरून पडले होते.त्यामध्ये चारही खोल्यांचे नुकसान होऊन संसारोपयोगी साहित्य अडकून पडले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बी. आर.चौगुले, ग्रामपंचायत सचिव बाळासाहेब कळंत्रे यांनी पाहणी केली. यामध्ये या घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे दत्तात्रय गणू कोळी यांच्या हद्दीत बांधलेले जयश्री शिवाजी कोळी यांचे 3५ फूट बाय ४० फुटाचे बांधकाम असलेल्या घरावरील ही पत्रे, लोखंडी बार सह वादळी वाऱ्याने उडून जवळजवळ १०० फुटावर अंतरावर लोकल रोड पास करून राष्ट्रीय महामार्ग शेजारी असणाऱ्या झाडावरती जाऊन पडले होते. या ठिकाणी मोठी दोन झाडे नसती तर हे पत्रे राष्ट्रीय महामार्गावर जाऊन पडले असते. यावळी मोठी दुर्घटना घडली असती कारण राष्ट्रीय महामार्गावर नेहमी वाहनांची मोठी वर्दळ असते. कोळी यांच्या घरांचे अंदाजे दोन लाखापर्यंत नुकसान झाले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पाटील यांनी घटनेची पाहणी केली. याचप्रमाणे नायकू पाटील मळा शेजारी विष्णू पाटील, रमेश पाटील, पांडू शेळके, तसेच साळुंखेवाडी येथील प्रकाश साळुंखे यांनी दारासमोर जनावरांसाठी बांधलेले पत्र्याचे शेड ही उडून गेले आहेत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नायकुपाटील मळ्यातील रस्त्यावर एक झाड कोसळल्याने विजेच्या तारा तुटल्या असून झाड रस्त्यावर कोसळून मुख्य रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. गावातील उंच घरे असणार्या घरावरील ही कवले मोठ्या प्रमाणात उडून गेले आहेत. त्याच प्रमाणे शेतातील काढून टाकलेला कडबा, बेंगलोर बाजारपेठेत पाठवण्यासाठी दारात आणून ठेवलेला कांदा ही भिजलेला आहे.काही ठिकाणी कार्यक्रमासाठी दारात उभारलेले मंडपाची कपडेही फाटुन गेले आहेत. या वादळी वाऱ्यासह गारपीठाने अनेकांची मोठ्याप्रमाणात तारांबळ उडाली होती.
