कोगनोळी : हदनाळ तालुका निपाणी येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यावतीने कागल येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगार व्यवस्थापक योगेश सनगर यांना त्वरित बस सुरू करण्याचे निवेदन देण्यात आले.
कोरोना काळामध्ये गेल्या दीड वर्षा पासून आज पर्यंत या भागांमधील आंतरराज्य बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आता शासनाच्या नियमाप्रमाणे शाळा कॉलेजेस सुरू करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी जावे लागते. हदनाळ येथील बहुसंख्य विद्यार्थी हे कागल कोल्हापूर व निपाणी अशा ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. यांना ही बस व्यवस्था बंद असल्या कारणाने शाळेला जाण्याचे अवघड झालेले आहे. हदनाळ कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचे गाव असून येथील अनेक विद्यार्थी पर राज्यांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. बससेवा बंद असल्याने या विद्यार्थ्यांना कागल, कोल्हापूर किंवा निपाणीकडे जाण्यासाठी बस नसल्याने त्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी निर्माण होत आहे. तरी संबंधित बस व्यवस्थापकांनी या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विचार करून त्यांना त्वरित पास उपलब्ध करून देऊन बस सेवा सुरळीत करून द्यावी व विद्यार्थ्यांना सहकार्य करावे असे विद्यार्थ्यांच्याकडून निवेदनात नमूद करून आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी शिवसेनेच्या महिला अध्यक्षा विद्या गिरी यांच्यासह प्रांजली पाटील, राजनंदिनी पाटील, संगीता पाटील, शुभांगी राऊत, साक्षी पाडेकर, गायत्री मगदूम यांचेसह हदनाळ व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
