भाविकांसाठी पूर्ण क्षमतेने मंदिरे खुली : पर्यटनही येणार पूर्वपदावर
निपाणी : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थोपविण्यासाठी सरकारने गेल्या 17 महिन्यांपासून मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेशबंदी केली होती. ही प्रवेशबंदी पूर्ण क्षमतेने उठविण्यात आल्यामुळे चिकोडी तालुक्यातील मंदिरांमधील देवाला भेटण्यासाठी आसुसलेल्या भाविकांच्या विरहाला अखेर पूर्णविराम लागला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थोपविण्यासाठी राज्य सरकारने भाविकांसाठी मंदिर प्रवेशावर बंदी घातली होती. ही प्रवेशबंदी उठविण्यात आल्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यात निपाणी तालुक्यात पुरातन काळातील असलेल्या आडी येथील मल्लिकार्जुन, ममदापूर येथील तुळजाभवानी, हुक्केरी तालुक्यातील शिप्पूर येथील रामलिंग, निपाणीती पुरातन महादेव मंदिरसह इतर मंदिरांमध्ये दर्शनासाठी दोन दिवसापासून भक्तांनी हाजेरी लावली आहे. त्याशिवाय गावागावातील मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे त्यामुळे भाविक आतून समाधान व्यक्त होत आहे. काही गावात असलेल्या मंदिरामध्ये दुर्गा देवी मूर्तीची प्रतिष्ठापना करून जागर सोहळा सुरू झाला आहे.
मंदिर आणि तीर्थक्षेत्रांमध्ये फुले, पूजेचे साहित्य आदी उपयुक्त वस्तूंची विक्री करणार्यांचे दीड वर्षापासून अर्थकारण ठप्प झाले होते. येणारे भाविक येणे बंद झाल्यामुळे पूजापाठातून पुरोहितांना उत्पन्न नसल्याने हवालदिल झाले होते. पण पुन्हा मंदिरे खुली झाल्याने मंदिरांशी संबंधित असलेल्या व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.
धार्मिक पर्यटनामुळे जिल्ह्यात होणारी उलाढाल आता पूर्ववत होणार असल्याने मंदिर परिसरात लगबग वाढली आहे.
