Friday , September 20 2024
Breaking News

आरसीबीने मारली बाजी; सीएसकेचा २७ धावांनी पराभव करत प्लेऑफ्समध्ये दमदार एन्ट्री

Spread the love

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात आरसीबीने उत्तम सांघिक खेळ करून सलग सहाव्या विजयाची नोंद केली. आरसीबी व सीएसके या दोन्ही संघांचे १४ गुण आहेत, परंतु बंगळुरूने आज शानदार विजय मिळवून नेट रन रेटच्या जोरावर प्ले ऑफचे तिकीट पक्के केले. रचीन रवींद्रचा रन आऊट हा सामन्याला कलाटणी देणारा ठरला, त्यात आरसीबीचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने अफलातून झेल घेऊन सामन्याला निकाल निश्चित केला. रवींद्र जडेजा व महेंद्रसिंग धोनी यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला होता, परंतु १० धावा प्ले ऑफसाठी कमी पडल्या.

ग्लेन मॅक्सवेलने पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाडची विकेट मिळवून सीएसकेला मोठा धक्का दिला. डॅरिल मिचेलही (४) यश दयालच्या गोलंदाजीवर विराटच्या हाती झेल देऊन परतला. चेन्नईला २.२ षटकांत १९ धावांवर दुसरा धक्का बसला. पण, रचिन रवींद्र व अजिंक्य रहाणे यांनी ३१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करून सीएसकेची पडझड थांबवली अन् धावांची गतीही वाढवली. १०व्या षटकात ल्युकी फर्ग्युसनला ही जोडी तोडण्यात यश आले. अजिंक्य २२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३३ धावांवर बाद झाला आणि रवींद्रसह त्याची ६६ धावांची भागीदारी तुटली.

रवींद्रवर सर्व भीस्त होती आणि त्यानेही ३७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावा कुटल्या होत्या. पण, शिवम दुबेसोबत त्याचे ताळमेळ तुटले अन् त्याला रन आऊट होऊन माघारी जावे लागले. दुबेही (७) आज इम्पॅक्ट पाडू शकला नाही आणि चेन्नईचा निम्मा संघ ११९ धावांवर माघारी परतला. आरसीबीने सामन्यात चांगले पुनरामन केले आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा उत्साह वाढलेला दिसला. १५व्या षटकात मिचेल सँटनरचा (३) अफलातून झेल घेऊन फॅफ ड्यू प्लेसिसने सामा एकतर्फी केला.

सीएसकेला प्ले ऑफसाठी १२ चेंडूंत ३५ धावा करायच्या होत्या आणि जडेजा व महेंद्रसिंग धोनी ही अनुभवी जोडी मैदानावर होती. १९व्या षटकात दोघांनी १८ धावा चोपल्या आणि २५ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ६ चेंडूंत १७ धावा चेन्नईला प्ले ऑफच्या तिकीटासाठी हव्या होत्या. धोनीने पहिलाच फुलटॉस चेंडू ११० मीटर लांब षटकार खेचला. या पर्वातील हा सर्वात लांबचा षटकार ठरला. पुढच्या चेंडूवर धोनी (२५) उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. शार्दूल ठाकूर स्ट्राईकवर होता आणि एक डॉट बॉल गेल्याने ३ चेंडूंत ११ धावा हव्या होत्या. २ चेंडू १० धावा असताना जडेजा स्ट्राईकवर आला. पण, यश दयालने दोन डॉट बॉल टाकले. आणि चेन्नईला २७ धावांनी हरवले. चेन्नईला ७ बाद १९१ धावा करता आल्या. जडेजा २२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, विराट कोहली (४७) व फॅफ ड्यू प्लेसिस (५४) यांनी ७८ धावांची भागीदारी करून दिली. सीएसकेचे फिरकीपटू मिचेल सँटनर (१-२३) व महिशा तीक्षणा (०-२४) यांनी मधल्या षटकांत धावांची गती संथ केली. पण, कॅमेरून ग्रीन व रजत पाटीदार यांनी २८ चेंडूंत ७१ धावा चोपल्या. पाटीदार २३ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावांवर झेलबाद झाला. दिनेश कार्तिक (६ चेंडूंत १४ धावा) आणि ग्लेन मॅक्सवेल (५ चेंडूंत १६ धावा) यांनी झटपट धावा केल्या. ग्रीन १७ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला आणि बंगळुरूने ५ बाद २१८ धावा केल्या.

About Belgaum Varta

Check Also

भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर

Spread the love  नवी दिल्ली : टीम इंडियाचा ‘गब्बर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *