नवी दिल्ली : पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा सलग 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभव केला. ज्यामुळे आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीग पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसी विश्वचषक सुपर लीगमध्ये पाकिस्तानने आतापर्यंत 14 सामने खेळून 8 जिंकले आहेत. पाकिस्तानचे 80 गुण आहेत. भारताचं स्थान घसरलं आहे. भारतीय संघाने आतापर्यंत आयसीसी विश्वचषक सुपर लीगमध्ये 12 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 8 जिंकले आहेत आणि 4 पराभव पत्करले आहेत. भारत 79 गुणाने सहाव्या क्रमांकावर आहे.
भारतासाठी आश्चर्याची गोष्टी म्हणजे पाकिस्तान 2 स्थानांनी पुढे गेला आहे. पाकिस्तानला वेस्ट इंडिजसोबत अजून एक वनडे सामना खेळायचा आहे. भारत सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. अशा स्थितीत आयसीसी विश्वचषक सुपर लीग फेरीत भारत पाकिस्तानला मागे टाकू शकेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
बांगलादेशचा संघ आयसीसी विश्वचषक सुपर लीगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. बांगलादेशने आत्तापर्यंत 18 सामने खेळले आहेत ज्यात 12 जिंकले आहेत. बांगलादेश संघाचे 120 गुण आहेत. इंग्लंडचा संघ दुसर्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने या कालावधीत 15 सामने खेळले असून यादरम्यान त्यांनी 9 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत. इंग्लंडचे 95 गुण आहेत. आश्चर्य म्हणजे तिसर्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा संघ आहे. अफगाणिस्तानने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत ज्यात 9 जिंकले आहेत तर 2 हरले आहेत. अफगाणिस्तानचे 90 गुण आहेत.
