Saturday , November 2 2024
Breaking News

खेळाडू फक्त पैशासाठी खेळतील असे मला वाटत नाही : सौरभ गांगुली

Spread the love

नवी दिल्ली : आयपीएलचे प्रसारण हक्क तब्बल 48 हजार 390 कोटी रूपयांना विकले गेल्यामुळे बीसीसीआयचा खिसा चांगलाच गरम झाला आहे. क्रीडा जगतात आता आयपीएलच्या श्रीमंतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या सर्व प्रक्रियेनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने माध्यमांना एक दीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्याने आयपीएल प्रसारण हक्क लिलाव प्रक्रियेच्या जबरदस्त यशामुळे क्रिकेटचा पाया मजबूत होणार असल्याचे सांगितले. तसेच याचा खेळाडूंवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. क्रिकेट हे फक्त पैशासाठी खेळले जात नाही तर प्रतिभेसाठी देखील खेळले जाते असे मत त्यांनी व्यक्त केले.
सौरभ गांगुली म्हणाला की, “क्रिकेट हा खेळ फक्त पैशांचा नसतो, तो प्रतिभेचा असतो. आयपीएलच्या ई-लिलावाने आपल्या देशात खेळ किती मजबूत आहे हे दाखवून दिले,” गांगुली पुढे म्हणाला, “आयपीएलच्या क्रीडा जगतामधील अभूतपूर्व वाढीची कहाणी ही बीसीसीआयच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या कर्मचार्‍यांवरील लोकांच्या प्रचंड विश्वासाचा परिणाम आहे. मला खात्री आहे, की त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याने आम्ही जागतिक क्रीडा मंचावर ब्रँड आयपीएलला नवीन उंचीवर नेण्यात सक्षम होऊ.”
सौरभ गांगुलीला खेळाडूंची प्राथमिकता बदलेल का? याचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम होईल का असे विचारले असता. त्याने ’सर्वात प्रथम पैशाचा आणि कामगिरीचा काही संबंध नसतो. सुनिल गावसकर, अनिल कुंबळे ते राहुल द्रविड यांच्याकाळात जितका पैसा आताच्या खेळाडूंना मिळतो त्याच्या जवळपासही ही मंडळी पोहतच नव्हती. मात्र त्यांच्या सर्वांमध्ये कामगिरी करण्याची एक भूक होती. मला असं वाटत नाही की खेळाडू फक्त पैशासाठी खेळतात. खेळाडू त्यांना भारताकडून खेळल्यावर जो मिळणारा मान आणि सन्मान असो त्यासाठी ते खेळतात. प्रत्येक खेळाडूला मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकाव्यात असेच वाटत असते.’
महिला आयपीएलसाठी कटिबद्ध : शहा
बीसीसीआयचे सचिव जय शहा या वेळी म्हणाले, की “लिलावाच्या नवीन फेरीने आयपीएलचे जागतिक खेळातील सर्वांत मोठ्या लीगमध्ये रूपांतर केले आहे. क्रिकेटमधून येणारा हा पैसा तळागाळातील क्रीडा क्षेत्राला मदत करेल,” तसेच पुढील वर्षी महिला आयपीएल सुरू करण्यासाठी बोर्ड कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *