
दसऱ्याची सुट्टी वाढवल्याने शाळांचा अभ्यासक्रम मागे
बंगळूर : राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण (जातीय जनगणना) पूर्ण करण्यासाठी दसऱ्याची सुट्टी दहा दिवसांनी वाढवण्यात आली होती. त्यामुळे शाळांचा अभ्यासक्रम मागे पडल्याने, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने दररोज एक तास अतिरिक्त वर्ग घेण्याचे आदेश दिले आहेत.
विभागाच्या परिपत्रकानुसार, प्राथमिक शाळांनी हे अतिरिक्त वर्ग ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत, तर हायस्कूलांनी २४ जानेवारी २०२६ पर्यंत घ्यावेत. शाळांना सकाळी किंवा संध्याकाळी वर्ग घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
दसऱ्याची सुट्टी वाढवल्याने आठ पूर्ण दिवस आणि दोन अर्धे दिवस (शनिवार) असा एकूण दहा दिवसांचा शैक्षणिक तोटा झाला आहे. सरकारने जातीय जनगणनेची अंतिम मुदत १६ ऑक्टोबरपर्यंत वाढवल्यामुळे दिवाळीनंतरच शाळांमध्ये नियमित अध्यापन सुरू झाले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबत तातडीने आदेश जारी करण्याचे निर्देश दिले. प्राथमिक शाळांमध्ये ७४ तासांचे, तर हायस्कूलमध्ये ६६ तासांचे अध्यापन गमावले गेले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वर्गांचा कालावधी ४० मिनिटांचा, तर हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी ४५ मिनिटांचा असेल. तसेच जानेवारी ते मार्च दरम्यान कमी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घेण्याचे निर्देश शाळा व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta