Saturday , July 20 2024
Breaking News

हैदराबादच्या खासगी बसला गुलबर्ग्याजवळ अपघात; ९ प्रवाशांचा होरपळून मृत्‍यू

Spread the love

बेळगाव : गोव्यातील पर्यटनस्थळांना भेटी देऊन आपल्या गावी परत जात असताना हैदराबाद येथील प्रवाशांच्या खासगी बसचा गुलबर्गा येथे भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने बसमधील नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्‍यान, वीस जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना गुलबर्गा येथील खासगी व शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात हा गुलबर्गा शहराबाहेरील हैदराबाद- सोलापूर राज्य मार्गावरील कमलापूर गावाजवळ आज (शुक्रवार) सकाळी घडला. घटनास्थळी गुलबर्गा शहर, ग्रामीण व कमलापूर पोलीस स्थानकाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पुढील तपास सुरू ठेवला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, हैदराबादचे रहिवासी असलेले प्रवासी हैदराबाद येथील ऑरेंज या संस्थेच्या खासगी बसने गेल्या दोन दिवसांपूर्वी गोव्याच्या पर्यटनासाठी गेले आहेत. गोव्यात पर्यटनस्थळांना भेटी देऊन ते आज हैदराबादकडे परतत होते. यावेळी गुलबर्गा शहराच्या बाहेर असलेल्या सोलापूर-हैदराबाद राज्यमार्गावर कमलापूर गावाजवळ समोरून येणाऱ्या कंटेनरला बसने जोराची धडक दिली. या अपघातात बसने पेट घेतल्याने संपूर्ण बस जळून खाक झाली.

या झालेल्या अपघातात बसमध्ये एकूण एकोणतीस प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर बसने अचानक पेट घेतल्याने बसमधील प्रवाशांची तारांबळ उडाली. या वेळी बसमधील वीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून, अन्य नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर कंटेनर चालकाचे दोन्ही पाय मोडले असून, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधील वीस प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांना गुलबर्गा शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाने धाव घेत पेटलेल्‍या बसची आग आटोक्यात आणली. या भीषण अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाल्मिकी महामंडळ घोटाळा; सरकार ८५ कोटी रुपये वसूल करणार : सिद्धरामय्या

Spread the love  भाजपच्या भ्रष्टाचारावर टीका बंगळूर : सरकार एसटी विकास महामंडळात लुबाडलेले ८५.२५ कोटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *