राज्यातील नेत्यांना बैठकीत एकसंध रहाण्याचा सल्ला
बंगळूर : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या निवडीसाठी आज दिल्लीत राज्यातील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, बी. के. हरीप्रसाद, केपीसीसीचे कार्याध्यक्ष आणि बहुतांश नेते या बैठकीत सहभागी झाले होते.
बैठकीत हायकमांडने काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी सादर केली. त्यापैकी १२० हून अधिक मतदारसंघांसाठी एकाच व्यक्तीच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
त्याशिवाय काही भागात तिकिटांसाठी मोठी स्पर्धा आहे. यावेळी काही विद्यमान आमदारांचे तिकीट गमवावे लागण्याची शक्यता आहे. संभाव्य यादीत कौटुंबिक राजकारणाचा प्रभाव दिसून येतो.
पाच किंवा सहा प्रभावशाली कुटुंबांनी एकापेक्षा जास्त तिकिटांसाठी शिफारस केली आहे. यावेळी काँग्रेस हायकमांडने उदयपूर घोषणेची सक्तीने अंमलबजावणी करून भाजपच्या आरोपांना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बहुतांश कौटुंबिक राजकारणात नवीन पिढीला संधी नाकारण्याची शक्यता आहे.
आधीच आमदार असलेले आणि पक्ष संघटनेत पाच वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलेल्यांच्या नावांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. प्रखर कौटुंबिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हायकमांड यादीत फेरबदल करून पुन्हा पाठवण्याची सूचना करतील, अशी शक्यता आहे.
साधारणत: पुढील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड सुरू झाली आहे. आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यातील मल्लिकार्जुन खर्गे हे एआयसीसीचे अध्यक्ष असल्याने विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत आणण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.
खर्गेंचा कडक इशारा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपला पराभूत करून सत्तेत येण्यासाठी काँग्रेस पक्षाची लगबग सुरू आहे. काँग्रेसने यापूर्वीच अनेक डावपेच आखून लढतीत रंगत आणली आहे. सर्वच पक्षांमध्ये येथेही काही गंभीर कमतरता आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गट-तटांची लढाई. याप्रकरणी खर्गे यांनी राज्यातील नेत्यांना कडक इशारा दिला आहे. पक्षाला राज्यात विजयी करणे महत्वाचे आहे. गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेऊन एकीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला त्यांनी दिल्याचे समजते.