धजद आता फुटीच्या मार्गावर; आमदारही संपर्कात असल्याचा दावा
बंगळूर : धर्म निरपेक्ष जनता दला (धजद)चे सुप्रीमो एच. डी. देवेगौडा यांचा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय फेटाळत पक्षाच्या कर्नाटक शाखेचे अध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी सोमवारी धजद पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार नसल्याचे सांगितले.
पक्षात संभाव्य फुटीचे संकेत देताना, माजी केंद्रीय मंत्री ईब्राहीम यांनी असा दावा केला की ‘धर्मनिरपेक्ष’ असल्यामुळे त्यांचा गट मूळ धजद आहे आणि प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते कर्नाटकातील संघटनेबद्दल निर्णय घेऊ शकतात.
त्यांनी माजी पंतप्रधान गौडा यांना आवाहन केले की त्यांनी भाजपशी युती करण्यास संमती देऊ नये, कारण शेजारच्या राज्यांमध्ये अनेकांनी पक्ष सोडला आहे. “आमचा पहिला निर्णय हा आहे की धजद एनडीएसोबत जाणार नाही. दुसरा निर्णय म्हणजे देवेगौडा यांना विनंती आहे की त्यांनी या युतीला आपली संमती देऊ नये,” असे इब्राहिम यांनी पक्षाच्या काही नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
भाजप-धजद करारानंतर केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील धजद नेत्यांनी पक्ष सोडल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
“कर्नाटकमध्ये मात्र अजूनही आम्हाला तुमच्याबद्दल आपुलकी आहे. तुम्ही वडिलासमान आहात. आम्ही त्यांना (गौडा) सांगू की आमचा भाजपशी कोणताही संबंध ठेवू नये,” असे सांगून इब्राहिम पुढे म्हणाले, की ते एक कोअर कमिटी स्थापन करणार आहेत, जी देवेगौडा यांची भेट घेईल आणि आजच्या बैठकीत घेतलेला निर्णय कळवेल.
केंद्रातील एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणून काम केलेल्या इब्राहिम यांनी आपल्या गटाला ‘मूळ धजद’ म्हणून संबोधले, ते म्हणाले की त्यांचा गट ‘धर्मनिरपेक्ष’ आहे.
गौडा आणि त्यांचा मुलगा एच. डी. कुमारस्वामी त्यांच्या निर्णयाशी सहमत नसल्यास त्यांच्या भविष्यातील कृतीबद्दलच्या प्रश्नावर इब्राहिम म्हणाले, “मी प्रदेशाध्यक्ष आहे. राज्यातील माझ्या पक्षाबाबत मला निर्णय घ्यायचा आहे, जो मी घेईन. आम्ही भाजपसोबत जाणार नसल्याचे आधीच ठरवले आहे. यापेक्षा दुसरे काय आहे?”
देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना जाऊ द्या, असे ते म्हणाले. “आम्ही त्यांना (गौडा आणि कुमारस्वामी) न जाण्यास सांगत आहोत. ते गेले तर आम्ही त्यांना बांधू शकत नाही. धजद आमदारांबाबत, कृपया प्रतीक्षा करा आणि हे आमदार कोण, किती आणि कुठे निर्णय घेतात ते पहा. वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला कळवू,” असे धजद प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला मात्र त्यांची नावे देण्यास नकार दिला. “मी त्यांची (आमदार) नावे उघड केल्यास दबाव निर्माण होईल. मी आमदारांसोबत वन-टू-वन बैठकाही घेईन,” असे इब्राहिम म्हणाले.
माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, जे धजदचे सेकंड-इन-कमांड आहेत, त्यांनी २२ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर एनडीएचा भाग होण्यास सहमती दर्शविली.