Monday , September 21 2026
Breaking News

बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधींची फसवणूक; बेळगाव जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून, संशयास्पद बँक खात्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजीपी सीआयडी कार्यालयाच्या निर्देशानुसार बेळगाव जिल्ह्यात तब्बल १४०० संशयास्पद बँक खात्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत रामराजन यांनी सांगितले की, फसवणूक करणारे विविध बहाण्यांचा वापर करून नागरिकांच्या नावावर बँक खाती उघडून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी गैरवापर करत आहेत. या संदर्भात आतापर्यंत तीन गुन्हे नोंदवण्यात आले असून तपास सुरू आहे.
निपाणी प्रकरणात पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी स्वतःच्या नावावर बँक खाती उघडून ती इतरांना वापरासाठी दिली होती. या खात्यांद्वारे देशातील विविध राज्यांमध्ये एकूण १४ गुन्हे नोंदवले गेले असून सुमारे ४६.१२ लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे.
दरम्यान, चिक्कोडी तालुक्यातील केरुर गावात दोन आरोपींनी ओळखीच्या लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून बँक खाती, पासबुक, एटीएम कार्ड आणि सिमकार्ड मिळवले. या माध्यमातून सायबर गुन्हे करण्यात आले असून १५ बँक खात्यांतून ४२.१३ लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. या प्रकरणाशी संबंधित देशभरात ६८ गुन्हे दाखल आहेत.
तसेच, रामदुर्ग तालुक्यातील मणिहाल गावातील एका आरोपीने स्वतःच्या नावावर अनेक बँक खाती उघडून त्यांचा सायबर फसवणुकीसाठी वापर केला. या प्रकरणात ४ खात्यांवर ८ गुन्हे नोंदवले गेले असून सुमारे १४.३१ लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. आरोपीची चौकशी आणि घराची झडती घेण्यात आली असून तपास सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी व्यक्तींना आपले बँक खाते, एटीएम कार्ड किंवा सिमकार्ड देऊ नये. तसेच सायबर फसवणुकीत सहकार्य केल्यास कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *