Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव जिल्ह्यात इंधन आणि गॅसचा तुटवडा नाही : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडर आणि इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. बेळगाव शहर आणि जिल्ह्यात पेट्रोल तसेच डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जर एखाद्या पंपावरील साठा संपला, तर केवळ पाच तासांच्या आत पुन्हा पुरवठा करण्याची यंत्रणा कार्यान्वित आहे. इंधन कंपन्या आणि पंप मालकांशी यावर सविस्तर चर्चा झाली असून कोठेही टंचाई नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. केवळ साठवणुकीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याने संभ्रम निर्माण झाला असून, पंपांवर बाटल्या किंवा कॅनमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलली जातील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी बोलताना बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी स्पष्ट केले की, पेट्रोल पंपांवर कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन विक्रीला परवानगी दिली जाणार नाही. अवैध साठवणूक आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कडक कारवाई करेल. कोणत्याही तक्रारीसाठी किंवा गोंधळाची माहिती देण्यासाठी नागरिकांनी ‘११२’ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपसंचालक मल्लिकार्जुन आणि हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष अजय पै उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *