Monday , September 21 2026
Breaking News

योग्य आहार, व्यायाम हीच गुरुकिल्ली : डॉ. सोनाली सरनोबत

Spread the love

 

हुंदरे स्मृती विवेकानंद व्याख्यानमाला

कडोली : आज चुकीच्या भौतिक सुखाच्या मागे लोक धावत आहेत. चमचमीत पदार्थ खायची चटक लागली असून ते शरीराला घातक ठरते. योग्य आहार, नियमित व्यायाम अशी कांही पथे पाळली तर आपले शारीरिक आहे आणि मानसिक आरोग्य चांगले राहील, असा सल्ला नियती फौंडेशनच्या अध्यक्षा व प्रसिद्ध डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी दिला.
कडोली येथील मराठी साहित्य संघ व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे आयोजित सुरेशजी हुंदरे स्मृती स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना डॉ. सोनाली सरनोबत बोलत होत्या. रविवारी (ता. 12) सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज कालकुंद्रीकर होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून ह. भ. प. सौ. प्रभावती कृष्णा मस्कार व कस्तुरबा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. मंगल भोसले उपस्थित होत्या.
आपल्या बदलत्या जीवन पद्धतीमुळे अनेक आजाराना निमंत्रण मिळते असा उल्लेख करून डॉ. सरनोबत म्हणाल्या, “काहींही खाऊन आपण शरीराची कचरापेटी केली आहे. अनेक दुःखनी कमी वयात सुरु होत आहेत.. परिणामी सामाजिक आरोग्याचा प्रश्नही उभा ठाकला आहे. विविध प्रकारच्या ताण तणावामुळे आजार बळावत आहेत. हे टाळायचे असेल तर आपली जीवन पद्धती सुधारणे महत्वाचे आहे.”
जागतिकीकरणानंतर फार मोठे बदल घडले आहेत. तयार (रेडिमेड) पदार्थ घेण्याकडे कल वाढला आहे. तरुणांमध्ये निष्क्रियत्ता, कामचुकारपणा वाढला आहे, मनाला हवा असणारा विसावा, मानसिक समटोल हरवला आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मानसिक आरोग्यासाठी अध्यात्म महत्वाचे असून अध्यात्मामुळे लढण्याचे बळ मिळते असे मत त्यांनी नोंदविले. एकमेकांशी संवाद साधा, नाती घट्ट जोडा, मनात साचलेपणा येऊ देऊ नका असा मौलिक उपदेशही त्यांनी केला. तुमच्यात मानसिक बदल करा तरच तुमचे सामाजिक आरोग्य चांगले राहील असे सांगून आपण सुजान नागरिक बनण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही डॉ. सरनोबत यांनी केले.
प्रारंभी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सौ. प्रभावती मस्कार यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तर सर्व पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. शिक्षिका सौ. सविता पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. सौ. मंगल भोसले, सौ. भारती शहापूरकर, सौ. पाटील व उमेश देसाई यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार झाला. शिवाजी कुट्रे यांनी सूत्रसंचालन केले. बाबुराव गौण्डवाडकर यांनी आभार मानले. यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *