- इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर….
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे “राजा शिवछत्रपती”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाची प्रतीक्षा सालाबादप्रमाणे यंदाही बेळगाववासियांना लागली आहे.
यंदाचा पारंपारिक शिवजयंती उत्सव 19 एप्रिल रोजी होणार असून दैदिप्यमान आणि भव्यदिव्य मिरवणूक सोहळ्याने हा उत्सव अधिकच दिमाखात पार पडणार आहे.
शिवजयंती सोहळ्याने लाभलेली परंपरा आणि शिवभक्तांचा उत्साह यामुळे आज शेकडो वर्षानंतरही उत्सव अधिकच थाटात पार पडत आहे. चित्ररथ मिरवणूक, जिवंत देखावे, कसरतीचे खेळ आणि शिवभक्ती यामुळे बेळगावचा शिवजयंती उत्सव देशभरात गाजतो आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातून हजारो शिवभक्त या सोहळ्याचा अनुभव घेत असतात. परंपरा, आजची स्थिती आणि युवा वर्गाचे वैचारिक मत याद्वारे शिवजयंतीचा उत्साह दरसाल अधिक वृद्धिंगत होत आहे.
परंपरा आणि पुरावा
शिवजयंती उत्सवाला शतकाची परंपरा लाभून काळ पुढे लोटला आहे. “दीनबंधू” या वृत्तपत्रातील एका शिवभक्ताने लिहिलेल्या पत्रातून शिवजयंतीची परंपरा साधारणतः 135 वर्षापूर्वीची असल्याचा पुरावा शिवप्रेमींना मिळाला आहे. 19 मे 1895 सालच्या वृत्तपत्रात उत्सव दरसाला प्रमाणे थाटात साजरा झाला. कपिलनाथ मंदिर येथे तीनशे ते चारशे शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला. आबाजी सावंत आणि अण्णासाहेब पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत शिवजयंतीचे पाचवे वर्ष उत्साहात साजरे झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे शिवजयंती उत्सव साधारण 1890 च्या आसपास सुरू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
साधारणतः 1870 मध्ये महात्मा फुले यांनी शिवजयंती उत्सवाची संकल्पना मांडली. साधारणतः 1895 मध्ये शिवजयंती उत्सवाची देशव्यापी चळवळ झाली असे पुराव्यात नमूद आहे. तत्पूर्वी 1890 मध्ये स्वयंप्रेरणेने बेळगाव येथील शिवभक्तांनी शिवजयंती साजरी केल्याचे नमूद होते.
ब्रिटिशांच्या राजवटीत संस्कृतीचा उत्सव, सामाजिक एकतेची जपणूक करणे ही खूप मोठी बाब होती. राष्ट्रीय एकोपा, सामाजिक बांधिलकी, जपत वैचारिक स्पर्धा, सामुदायिक खेळ, मिठाई वाटप शिवजयंतीच्या निमित्ताने करण्यात येत आल्याचे दुर्मिळ वृत्तपत्रातील पुराव्यात नमूद केले आहे.
रोपट्याचा वटवृक्ष
शिवजयंतीची अठराव्या शतकातील सुरुवात म्हणजे जणू एक रोपटेच होते. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षांपूर्वी स्वराज्याची ज्योत पेटवली आणि आज शिवजयंतीच्या चित्ररथ मिरवणुकीद्वारे त्यांच्या कार्याचा वारसा शिवभक्तांकडून जोपासला जात आहे. परंपरा आणि सद्य परिस्थिती यांची सांगड घालून तो वारसा पुढे जोपासणे म्हणजे वटवृक्ष अधिकच भक्कम भव्य करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही परंपरा काळासोबत अधिक बलवान बनत जातात. तसाच शिवजयंती उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक, व्याख्यान, सामाजिक उपक्रम याद्वारे अधिक तेजस्वी व दैदीप्यमान केला जात आहे.
चित्ररथ मिरवणूक हेच वैशिष्ट्य
बेळगाव शिवजयंती सोहळ्याचा चित्ररथ मिरवणुकीतील सजीव देखाव्यांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. शिवजन्मोत्सव सोहळ्यापासून ते शिवरायांच्या पराक्रमाची यशोगाथा चित्ररथ मिरवणुकीत सादर केली जाते. विविध सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळे डोळ्याचे पारणे फेडणारी सजीव देखावे सादर करतात.
यंदाचा शिवजयंती उत्सव 19 एप्रिल रोजी असून बेळगावची चित्ररथ मिरवणूक 21 एप्रिल रोजी होणार आहे तर शहापूर विभागाची चित्ररथ मिरवणूक दिनांक 20 रोजी होणार आहे यामुळे त्या दृष्टिकोनातून शिवप्रेमींनी पूर्वतयारी सुरू केली असून सजीव देखावे, ढोल- ताशा पथके, कसरतीचे खेळ तसेच सामाजिक उपक्रमाची योजना आखली जात आहे. सालाबाद प्रमाणे यंदाचा सार्वजनिक शिवजयंती उत्सव दिमाखात पार पडणार असल्याचे संकेत आहे.
अंकुश केसरकर
अध्यक्ष, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ बेळगाव.
यंदाचा शिवजयंती उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणार असून अक्षयतृतीयेपासून सुरू झालेला शिवजयंती सोहळा दिनांक 21 एप्रिल रोजी चित्ररथ मिरवणुकीने पार पडणार आहे. शिवरायांचा इतिहास सादर करणारे सजीव देखावे हेच मिरवणुकीचे वैशिष्ट्य आहे. डीजेला फाटा देऊन मंडळांनी चित्ररथ मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे नूतन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी “बेळगाव वार्ता”शी बोलताना सांगितले. माझ्यासारख्या तरुणावर सार्वजनिक शिवजयंती मंडळाची जबाबदारी देण्यात आली असून सर्व शिवप्रेमी शिवाजी महाराजांच्या कार्याला व इतिहासाला साजेसा उत्सव साजरा करूया असे आवाहन तरुण पिढीला त्यांनी केले आहे..
स्पर्धा
सामाजिक उपक्रमांतर्गत दिनांक 25 रोजी गड किल्ले चढणे, उतरणे स्पर्धेचे राजहंसगडावर आयोजन केले असून जास्तीतजास्त शिवप्रेमी बेळगावकरांनी सदर स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन देखील मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.
- – पत्रकार, राधिका सांबरेकर
Belgaum Varta Belgaum Varta